वरपूडकर गटाला ११तर बोर्डीकर गटाला ९ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST2021-03-24T04:15:53+5:302021-03-24T04:15:53+5:30

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीअंतर्गत १४ जागांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यामध्ये वरपूडकर गटाला ८ जागा मिळाल्या. त्यामध्ये ...

11 seats for Varpudkar group and 9 seats for Bordikar group | वरपूडकर गटाला ११तर बोर्डीकर गटाला ९ जागा

वरपूडकर गटाला ११तर बोर्डीकर गटाला ९ जागा

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीअंतर्गत १४ जागांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यामध्ये वरपूडकर गटाला ८ जागा मिळाल्या. त्यामध्ये परभणी गटातून आ.सुरेश वरपूडकर यांनी दत्ता गोंधळकर यांचा ८१ मतांनी पराभव केला. वरपूडकर यांचा ८७ तर गोंधळकर यांचा ६ मते पडली. सोनपेठ गटात अटीतटीची लढत झाली. येथे माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांनी गंगाधर कदम बोर्डीकर यांचा एका मताने पराभव केला. विटेकर यांना १९ तर बोर्डीकर यांना १८मते मिळाली. औंढा नागनाथ गटातून राजेश पाटील गोरेगावकर विजयी झाले. त्यांना ३४ तर विरोधातील शेषराव कदम यांना २८ मते मिळाली. वसमत गटातून आ. राजू नवघरे यांनी सविता नादरे यांचा पराभव केला. नवघरे यांचा ६७ तर नादरे यांना ९ मते मिळाली. कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया गटात माजी आ.सुरेश देशमुख यांनी बालासाहेब निरस यांचा पराभव केला. देशमुख यांना ४३ तर निरस यांना २७ मते मिळाली. अनुसूचित जाती, जमाती गटातून शिवसेनेचे अतुल सरोदे यांनी भाजपाचे शिवाजी मव्हाळे यांचा पराभव केला. सरोदे यांना ८४३ तर मव्हाळे यांना ६८५मते मिळाली. इतर मागासप्रवर्ग गटातून परभणीचे उपमहापौर भगवान वाघमारे यांनी प्रल्हाद चिंचाणे यांचा पराभव केला. चिंचाणे यांना ७१६ तर वाघमारे यांना ८१३ मते मिळाली. महिला प्रतिनिधी गटातून प्रेरणा वरपूडकर यांनी विद्या चौधरी यांचा पराभव केला. वरपूडकर यांना ८५७तर चौधरी यांना ५५९ मते मिळाली. बोर्डीकर गटाने ५ जागांवर विजय मिळविला. त्यात सेलू गटातून आ.मेघना बोर्डीकर यांनी वर्षा लहाने यांचा पराभव केला. बोर्डीकर यांना ३३ तर लहाने यांना १५ मते मिळाली. कळमनुरी गटातून माजी खा.शिवाजी माने यांनी सुरेश वडगावकर यांचा पराभव केला. माने यांना ४६ तर वडगावकर यांना ३९ मते मिळाली. इतर शेती संस्था गटातून भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी विजय जामकर यांचा पराभव केला. जामकर यांना २४३ तर भरोसे यांना २६५मते मिळाली. महिला प्रतिनिधी गटातून भावना कदम बोर्डीकर यांनी रुपाली राजेश पाटील गोरेगावकर यांचा पराभव केला. बोर्डीकर यांना ८४५ तर गोरेगावकर यांना ६९९मते मिळाली.

चिठ्ठीने मायंदळे यांना दिली साथ

विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून बोर्डीकर गटाचे दत्तात्रय मायंदळे व वरपूडकर गटाचे ॲड.स्वराजसिंह परिहार यांना प्रत्येकी ३६१मते मिळाली. तिसरे उमेदवार भगवान वटाणे यांना ३मते मिळाली. परिहार व मायंदळे यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली. त्यात मायंदळे यांच्या बाजुने कौल मिळाला. त्यामुळे नशिबाची मायंदळे यांना साथ मिळाली.

सात संचालक यापूर्वीच बिनविरोध

वरपूडकर गटाचे तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात मानवतमधून पंडितराव चोखट, पूर्णेतून बालाजी देसाई, सेनगावमधून साहेबराव पाटील गोरेगावकर बिनविरोध झाले. बोर्डीकर गटाकडून चार उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यात स्वत: बोर्डीकर, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.तानाजी मुटकुळे, भगवान सानप यांचा समावेश आहे.

‘‘ मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. आम्ही चांगली लढत दिली. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद कोणाकडे जाईल, याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

- आ.मेघना बोर्डीकर

‘‘ आमची एक जागा एका तर दोन जागा कमी मताने गेल्या. असे असले तरी मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत सर्वांसोबत चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल.

-आ.सुरेश वरपूडकर

‘‘ जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आम्ही चार जण निवडून आलो आहोत. यापुढे अध्यक्षपदासाठी पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करुन अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या प्रमाणे घेण्यात येईल.

-आ.बाबाजानी दुर्राणी

Web Title: 11 seats for Varpudkar group and 9 seats for Bordikar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.