पैसे खाली पडल्याची थाप मारून ११ लाखांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 19:38 IST2021-12-14T19:32:04+5:302021-12-14T19:38:40+5:30
पाच लाख रोख आणि सहा लाखांची रोकड असलेली पिशवी दुचाकीला लावली होती.

पैसे खाली पडल्याची थाप मारून ११ लाखांचा मुद्देमाल लंपास
जिंतूर ( परभणी ) : 'तुमचे पैसे खाली पडले', अशी बतावणी करून दुचाकीला अडकवलेली ११ लाखांचा मुद्देमाल असलेली पिशवी लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.१३) भरदुपारी बारा वाजेच्या सुमारास शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
वायाळ पांगरी (ता.मंठा) येथील रहिवासी व सध्या बोरी (ता.जिंतूर) येथे वास्तव्य असलेले शिक्षक संतोष देशमुख यांनी सोमवारी शहरातील इंडिया बॅंकेच्या येलदरी रोड शाखेत तारण असलेले सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने सोडवून घेतले. त्यानंतर रोख पाच लाख रुपये असलेल्या एका पिशवीत त्यांनी ते दागिने ठेवले. एकूण ११ लाख रुपयांचा मुद्देमाल असलेली पिशवी दुचाकीच्या हॅंडलला अडकून ते शहरापासून जवळच असलेल्या पुंगळा येथील नातेवाईकाकडे जात होते.
दरम्यान, अचानक एका अनोळखी व्यक्तीने, 'तुमचे पैसे खाली पडले' असे देशमुख यांना सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या देशमुख यांनी मागे वळून पाहिले. याचदरम्यान पाठीमागून भरधाव वेगात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी देशमुख यांच्या दुचाकीला अडकवलेली रोख पाच लाखांसह दागिन्यांची पिशवी पळवली. देशमुख यांनी त्यांचा दूरवर पाठलाग केला मात्र ते हाती लागले नाहीत. त्यानंतर संतोष देशमुख यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक दिपक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कोकाटे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरु आहे.