मुंबईतून नर्मदेच्या खो-यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 12:04 PM2018-01-04T12:04:48+5:302018-01-04T12:05:14+5:30

अठराव्या वर्षीच मी मुंबई सोडून नर्मदेच्या खोºयात जायचं ठरवलं. घरातल्यांना काळजी होती, की ही खरंच गेली तर शिक्षण अर्धवट राहील. - पण मी हट्टी होते. नर्मदा बचाव आंदोलनाच्या मुंबईच्या आॅफिसमध्ये काम करत सुरुवात केली, आणि नंतर पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून खोºयात गेलेच.. आता त्यातच जीव गुंतला आहे!!

Narmada lost from Mumbai ... | मुंबईतून नर्मदेच्या खो-यात...

मुंबईतून नर्मदेच्या खो-यात...

Next

- योगिनी खानोलकर
नर्मदा आंदोलन तसं मी लहानपणापासून पाहिलेलं, ऐकलेलं होतं. १९९३-९४ च्या सुमारास जेव्हा मोठी आंदोलनं मुंबईत व्हायची तेव्हा मी माझ्या काकींबरोबर या आंदोलनाला मदत करा म्हणून हातात डबा घेऊन रस्त्यावर येणाºया-जाणाºयांकडून मदत गोळा करायचे. तेव्हा कशासाठी? काय? एवढं माहीत नव्हतं. त्यानंतर मधली वर्षं माझ्या शालेय अभ्यासात गेली. १९९८ मध्ये जेव्हा आंदोलनाने ‘रॅली फॉर द व्हॅली’ची घोषणा केली तेव्हा मी कॉलेजमध्ये बारावीला होते. अरुंधती रॉय यांच्या ग्रेटर कॉमन गुड या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं (बहुजन हिताय) वाचन आमच्या कॉलेजमध्ये प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांनी केलं आणि मला माझ्या लहानपणात फिरवलेल्या डब्याची आठवण झाली.
मला लहानपणापासून कामगारांचं वकील व्हायचं होतं. पण नर्मदेने मला कधी ओढून नेलं ते माझं मलाच कळलं नाही.
मी माझ्या कॉलेजमध्ये एन.एस.एस.मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यासाठी मला लीडरशिप कॅम्पला कॉलेजकडून पाठवलं होतं. दहा दिवसांच्या त्या कॅम्पच्या शेवटच्या दिवशी एन.एस.एस. युनिटचे युनिव्हर्सिटीचे प्रमुख भाषणात म्हणाले- आता तुमच्या एकेका लीडरकडे १०० मुलांची फौज आहे, तुम्ही हे जग बदलू शकता, लोकांना मदत करू शकता, माझ्याकडे नवनवीन कल्पना घेऊन या आपण त्या राबवू.
- भारावून जाऊन मी कॉलेजमध्ये परत आले, तेव्हा माझ्या डोक्यात नर्मदा खोºयातल्या विस्थापित आदिवासी भागात जाऊन मदत करायचा विचार घोळू लागला. कॉलेज फॅकल्टीशी बोलले तेव्हा ते म्हणाले, मुंबईबाहेरचा कार्यक्र म असेल तर तू युनिव्हर्सिटी प्रमुखांना भेटून बघ, त्यांनी मंजुरी दिली तर जा.
दरम्यान, एन.एस.एस.च्या नेहमीच्या प्रकल्पांमध्ये काहीच नावीन्य नव्हतं. जुन्या खड्ड्यांवर नवीन खड्डे करून झाडं लावणं, एका ठरलेल्या गरीब झोपडपट्टीत मागच्या अनेक बॅचेसनी केलेले सर्व्हे परत जाऊन करणं (ज्याला ते लोकही कंटाळलेले असायचे), एखाद्या अनाथालयाला भेट देऊन येणं या व्यतिरिक्त फारसं काही घडत नव्हतं. लीडरशिपचे कॅम्प करून आलात तर आता सर्वांच्या डायºया भरा आणि सर्वांना काम न करता १० मार्क्स वाटा हीच समाजसेवा, असे सूरही अनेक सिनिअर्सनी लावलेले. जे मला अधिकच अस्वस्थ करून टाकणारं होतं. या निराशेतून काहीतरी ठोस करायचं म्हणून मी नर्मदेचा प्रस्ताव मांडला होता. युनिव्हर्सिटी प्रमुखांना फार आशेने मी भेटायला गेले. दोन तास मला बाहेर थांबवलं गेलं. खूप आशा होती मला सरांकडून. पण मी नर्मदेचं नाव घेतलं तेव्हा ते फार लांब आहे , दूर आहे असं काही न बोलता सर म्हणाले, ‘तुम्हे पता है ये आंदोलन सरकारविरोधी है और हमे फंडिंग कौन करता है?...सरकार! तुम सोच ही कैसे सकती हो?’ - मला एक शब्द त्या लोकांच्या समस्येबद्दल बोलू दिला नाही. मला रडूच आलं. पण तिथून बाहेर पडण्याआधी मी सरांना म्हटलं (कोणत्या ताकदीने कोणत्या अधिकाराने माहीत नाही),
‘सर, आज आपसे एक सिख मिली है, जिसे मै जिंदगीभर याद रखूंगी के किसी के भी भाषण में दिये आश्वासनोंपर विश्वास नही रखना चाहिये और अपने रास्ते खुद बनाने चाहीये!’
- मी केबिनमधून बाहेर पडले आणि भरपूर रडून घेतलं. मी एन.एस.एस.चे दहा मार्कन घेता एन.एस.एस. सोडलं आणि नर्मदेच्या खोºयात गेले स्वत:च्या समाधानासाठी !
पण माझं शिक्षण चालू होतं. घरच्यांना भीती होती की मी तिथे गेले तर शिक्षण पूर्ण होणार नाही. मी लहान असल्याने माझ्यावर घरची तशी जबाबदारी नव्हती. मी हट्टीही खूप होते. शेवटी, ‘तू सुटीत जा आणि बाकीचे दिवस इकडे मुंबईतल्या आॅफिसमध्ये मदत करायला जा’ असं कॉम्प्रमाइज झालं आमच्यात. सकाळी कॉलेज केल्यानंतर मी रात्री १० वाजेपर्यंत आंदोलनाच्या मुंबईच्या आॅफिसमध्ये जायचे आणि जे पडेल ते काम करायचे. कधी फाइल्स लावून ठेव, कधी पत्र लिही. मुंबई-दिल्लीच्या कार्यक्र मांमध्ये, धरण्यांमध्ये लोकांबरोबर जाण्याने खोºयात न जाताही लोकांशी ओळख झाली होती. एक वर्ष असंच चाललं आणि २००० मध्ये मात्र मी नर्मदेच्या खोºयात पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून गेले.
१८ ते २२ हे वय असं असतं की, त्या वयात तुमचे जे विचार बनतात, जे तुम्ही प्रत्यक्ष पाहता आणि अनुभवता त्याने तुम्ही घडता. तिथे राहायला गेल्यावर एक गोष्ट तर नक्की झाली की मी घेतलेला निर्णय चुकीचा नाही. त्या आदिवासी गावा-पाड्यात एखाद दुसरा शिकलेला आणि पहिलीच पिढी आंदोलनाने सुरू केलेल्या जीवनशाळांमध्ये शिक्षण घेत होती. १३ ते १५ वयोगटातली मुलं. इथे आपली जास्त गरज आहे हे क्षणाक्षणाला पटत गेलं.
नंदुरबार जिल्हा नुकताच स्वतंत्र आदिवासी जिल्हा म्हणून धुळ्यापासून तुटला होता. धडगावसारख्या ठिकाणी एकच विंचूरकरांचं टेलिफोन बूथ आणि दोनतीन व्यापाºयांकडे असलेले लँण्डलाइन. घरी संपर्क करायचा झाला तरी बूथला लाइन लावावी लागायची. कधी फोन लागला तर लागला, नाही तर नाही. एक कार्यकर्ता आमच्या घरचे फोन नंबर घेऊन आणि लिहिलेल्या निरोपांची चिठ्ठी घेऊन दोन तासांच्या अंतरावर असलेल्या शहाद्याला जायचा आणि निरोप घेऊन यायचा. धडगावचं आमचं आॅफिस म्हणजे रस्त्यावरच्या मेटकर टेलर्सच्या दुकानाच्या बाजूला काढलेला छोटा गाळा. त्यातच काढलेलं अर्ध विटांचं न्हाणीघर. सर्व स्त्री पुरु ष कार्यकर्ते एकत्रच असायचे. १० बाय १० च्या खोलीत अर्धा भाग पाडून राहायचे. जास्त वेळ गावातच असायचे लोकांमध्ये. तालुक्याच्या ठिकाणची ही स्थिती होती, तर विस्थापित होणाºया गावांमध्ये जायला दोन ते तीन तास पायी जावं लागायचं. नदी तेव्हा छोटी होती तर एक दोन ठिकाणी पार करता यायची. बाकी ठिकाणी नावडीने प्रवास करायला लागायचा. अरुंधती रॉय यांना मिळालेल्या पुरस्काराच्या पैशातून आंदोलनाला बोट देण्यात आली होती. नदी पार करायचं ते एकमेव साधन होतं. आॅफिसचा आमचा पहिला फोन तीन वर्षांनी म्हणजे २००३ मध्ये आला. आम्हा सर्व कार्यकर्त्यांची नवीन बॅच होती. जुन्या कार्यकर्त्यांपैकी कोणी कोणी वेगवेगळ्या मार्गांना लागलेले. मेधाताई एकमात्र जुन्या, पहिल्यापासूनच्या आणि मध्य प्रदेशात काही जुने कार्यकर्ते होते. आमची भेट फक्त कार्यकर्ता बैठकीला व्हायची. त्यामुळे कोणते मुद्दे घेऊन काम करायचं हे जरी ढोबळ ठरलेलं असलं तरी त्याची अंमलबजावणी करण्याचं पुरेपूर स्वातंत्र्य आम्हाला मिळालं. ट्रायल अ‍ॅण्ड एरर करत करत वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न सोडवायची धडपड आम्ही करायचो. त्याने खूप शिकवलं. निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य मिळालं, एकप्रकारे जबाबदारीच. खरंतर अशिक्षित, अडाणी असलेल्या लोकांच्या समुदायानेच मला खूप गोष्टी शिकवल्या.
या आदिवासी मागास लोकांना काय येतं असं जे सातत्यानं शहरात किंवा अधिकाºयांकडून ऐकून होते त्याला पूर्ण छेद गेला. आपल्या समस्या सोडविण्यासाठी आंदोलनाच्या अनुभवातून त्यांना आलेली हुशारी कमालीची थक्क करणारी होती. किती तरी वेळा मला असं वाटतं की, चांगलं जगण्यासाठी शालेय शिक्षण घेणं गरजेचं नाही.
भाषेचा प्रश्नही होताच. आदिवासी भाषेशिवाय दुसरं काहीच संवादाचं साधन नसल्यानं ती भाषा कान टवकारून लक्ष देऊन ऐकावी लागे. हे लक्ष देऊन ऐकणं फक्त भाषा शिकण्यापुरतं मर्यादित न राहता, या समाजाची असलेली पारंपरिक समज, हुशारी, अनुभवाचे बोल याची दखल घ्यायचं भान आलं.
लोकांसाठी लढताना लोकांसाठी या शब्दाची जागा ‘लोकांबरोबर’ने घेतली. आदिवासी समाजाचं साधं जगणं, कमी गरजात समाधानी असणं, निसर्गाशी असलेल नातं या सर्व गोष्टी व्यक्तिगत आयुष्यात जगायलाही खूप काही शिकवून गेल्या.
आपण ज्या समाजात राहतो, वावरतो त्यांच्याशी स्वत:ची तुलना करतो. विकासाच्या धारणाही आपल्या आपल्या चौकटीत असतात.
तट्ट्याच्या घरात राहतो, मळके कपडे घालतो म्हणजे गरीब, दरिद्री या व्याख्येलादेखील इकडे काम करत असताना तडा गेला. श्रीमंतीचा फक्त पैशाशी संबंध नसून त्याच्या अनेक व्याख्या होऊ शकतात, हे इथंच कळलं.
...जीव गुंतला तिथं तो कायमचाच.
- योगिनी खानोलकर

(शिक्षणाने वकील असलेली योगिनी वयाच्या १८ व्या वर्षापासून नर्मदा बचाव आंदोलनात काम करते आहे. yoginikhanolkar2@gmail.com)

 

Web Title: Narmada lost from Mumbai ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.