शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

मु.पो.म्हसवड : आयुष्य सरळ पण नाय चालत ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 5:55 AM

गेल्या चार महिन्यांपासून मावशीबरोबर छावणीत राहणारी खमकी नगाबाई. बारावीची परीक्षा झाली तसा चारा छावणीत दाखल झालेला धनाजी बनगर. लिंगवरेचा हणमंत खांडेकर. नऊ जनावरांसह गेले चार महिने छावणीतच राहतोय. 16 वर्षाचा सुदर्शन ढेकळे आणि 17 वर्षाचा सचिन बोडरे बारावीची परीक्षा झाली तसे छावणीत कामाला लागले. दुष्काळ मोठा कडक पण त्याहून मोठी आहे, या पोरांची हिंमत भेटा त्यांना....

- प्रगती जाधव-पाटील

दुष्काळी भागातलं स्थळ आलं तर आधी त्याला प्राधान्य देईन, असं सांगणारी नगाबाई. मोठा भाऊ सैन्यात जाणार, मग घरी आईबापाकडं बघायला कोण नाय म्हणून मी गावातच राहीन, असं सांगणारा सुदर्शन. मळणी यंत्रात बोट सापडल्यामुळे सैन्यात जायला स्वतर्‍ अनफिट असला तरीही इतरांना प्रेरणा देणारा हणमंत.हे भारीच पोरं रखरखत्या उन्हात भेटले. दुष्काळ.. कोरड.. कडाक्याचं ऊन.. कठीण परिस्थिती हे असले शब्द आम्हाला हरवू शकत नाहीत. निसर्गानं या मातीत जन्माला घातलंय आणि तितक्याच कणखरपणानं आम्हाला जगण्याचं बळपण दिलंय. आम्ही जे आहोत, जसे आहोत त्यात खुश आहोत.. लोकांची किव करणारी नजर आणि उपकार करण्याची भाषा आम्हाला बोचते. निसर्गाच्या कोपातून बाहेर पडण्यासाठी आम्ही परस्परांची मदत घेतोय. तेच आम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. तुमच्यासाठी ही उन्हात रखरखणारी छावणी असेल; पण आम्ही या पसरलेल्या छावणीत जिवाची मुंबई करतोय. नो टेन्शनवाली..!असं हे पोरं बोलतात आणि आपण काय ऐकतोय यावर कानांचा विश्वासच बसत नाही.सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात 19 चारा छावण्या अस्तित्वात आहेत. यात साधारण तीस हजार जनावरे आणि 7 हजार नागरिक विविध ठिकाणांहून येऊन राहत आहेत. यात सातारा जिल्ह्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचाही यात समावेश आहे. जानेवारी महिन्यात सातार्‍यातील पहिली चारा छावणी 120 एकर क्षेत्रात म्हसवड येथे सुरू करण्यात आली. बस स्टॅण्ड परिसरात या विषयीची माहितीही देण्यात आली होती. ठिकठिकाणी मिळालेल्या माहितीचा प्रचार आणि प्रसार होऊन या छावणीत जनावरं आणि अनोळखी माणसं एकत्र येऊ लागली. आणि नात्यागोत्याची असल्यासारखी एकमेकांसह राहू लागली.गेल्या चार महिन्यांपासून आपल्या मावशीबरोबर छावणीत आलेल्या नगाबाई भिवाजी जिमल ही गावची पोरगी वयापेक्षा अधिक परिपक्व वाटली. लग्नानंतर नांदायला जायचं म्हटलं तर सुकाळ का दुष्काळ कोणता भाग निवडणार यावर म्हणते, ‘आमीच आमच्या भागाला नावं ठेवली तर आमच्या भावंडांची लग्न कशी व्हायची. दुष्काळी भागात नको म्हणून आमच्या घरात सुना कशा यायच्या? इतल्या पोरांना पोरी कोण देणार? आम्हीच आमचा भाग नाकारून नाय चालणार. आहो मोकळ्या वातावरणात रहायचं जे सुख आम्ही इथं घेतो ते मोठय़ा शहरात पर्यटनाच्या नावाखाली विकत घ्यावं लागतं. हा दोन-चार महिने जातात त्रासाचे; पण आयुष्य समदं सरळ पण नाय चालत ना?’नगाबाई छावणीत आल्यापासून इथं असणार्‍यांची गाडी शिकली, आता घरातून काही आणायचं असेल तर ती गाडीवर स्वतर्‍ जाऊन आणते.***बारावीची परीक्षा झाली तसा चारा छावणीत दाखल झालेला धनाजी बनगर. त्याला खूप शिकायचं आहे. उन्हाळ्याच्या सुटीत त्याला कौशल्य व्यवसाय शिकायचं होतं; पण त्याची छावणीत डय़ूटी लागली आणि तो इथंच राहू लागला. आपल्या वयाच्या सवंगडय़ांबरोबर धम्माल मस्ती करणं, छावणीलगत असलेल्या मैदानावर व्यायाम करणं हे त्याचं काम. म्हणाला, हे पण कौशल्य शिक्षणच चाललंय की माझं!  काही त्रागा नाही की चिडचिड नाही. ***

 आटपाडी तालुक्यातील लिंगवरेचा हणमंत तानाजी खांडेकर हा 23 वर्षाचा युवक घरच्या नऊ जनावरांसह गेले चार महिने या छावणीत तळ ठोकून आहे. लष्करात जाण्याची तीव्र इच्छा होती. शारीरिक क्षमतावाढीचा सरावही त्याने मन लावून केला. गोळाफेक तर तो लीलया करतो. काम करत असताना मळणी यंत्रात हाताचं एक बोट सापडलं आणि मिल्ट्रीत जाण्याच्या स्वप्नावर ‘मेडिकली अनफिट’चा ठपका लागला. दुष्काळी भागात नोकरी, रोजगार नाही म्हणून सैन्यात जायचं, असं नाही. सैन्यात भरती होण्याकडे पोटापाण्याचा प्रश्न म्हणून नव्हे तर जीवनपद्धती म्हणून पाहिले जाते. हणमंतच्या मामासह सात नातेवाईक सैन्यात आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हणमंतही ध्येयाच्या मागे धावत होता. आता तो घरची शेती सांभाळतो. दहापैकी पाच एकर शेतीत अन्नधान्य पिकते. पाण्याच्या परिस्थितीमुळे नऊ जनावरं घेऊन तो या छावणीत आहे.*** अवघ्या 16 वर्षाचा सुदर्शन रावसाहेब ढेकळे हा भेटला. म्हसवडच्या पंचक्रोशीतूनच सुदर्शन आलेला. त्याच्या गावातील बहुतांश लोक मुंबईत रंगाच्या व्यवसायात काम करतात. नुकतीच त्याने बारावीची परीक्षा दिली आहे. पेपर संपल्या-संपल्या वडिलांना मदत करण्यासाठी तो छावणीत दाखल झाला. त्याचा थोरला भाऊ सैन्यात भरतीसाठी प्रय} करतोय. सुदर्शनला ‘तू ही भरती होणार का?’ असं विचारलं तर तो चक्क नाही म्हणाला. आणि सांगू लागला,  ‘मला शेतकरी व्हायचंय! ‘घरी कोणीतरी नको का? थोरला भाऊ सैन्यात दाखल होणार म्हटल्यानंतर गावी आईवडिलांजवळ कोणीतरी पाहिजे ना!’***

गंगोती, ता. माण येथील सचिन बोडरे (वय 17) हा छावणीत भेटलेला युवक सैन्यात भरती होण्यासाठी जोरदार सराव करतोय. दुष्काळी परिस्थिती पाचवीला पूजलेली. तालुक्यात रोजगाराची फारशी संधी नाही. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचा गुण येथील मातीतूनच माणसांना मिळालेला. सचिनही त्याला अपवाद नाही. म्हसवडच्या छावणीत राहत असतानाही तो माणदेशी फाउण्डेशनतर्फे  चालविण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलात सैन्य भरतीत फिट होण्याच्या ध्येयामागे तो धावतोय. दुष्काळी परिस्थिती ही येथील तरुणाईची कमजोरी नाही तर ताकद वाटते झगडण्याची आता इथं पोरांना.ही धमक पाहून खरंच वाटत नाही की दुष्काळी चारा छावणीत आहोत, संकट मोठं डोक्यावर मात्र त्याहून मोठी या तरुण पोरांची हिंमत या छावणीत भेटते.

( प्रगती लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहे.)