Join us  

दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 6:12 AM

महायुती सरकारवर केली चौफेर टीका.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्राचे वाटोळेच करायचे होते तर भाजपने सत्ता काबीज का केली? या सरकारपेक्षा आमचे सरकार चांगले होते. केंद्रात तुमचे सरकार असले तरी आमचे इंजिन इथे सुरू होते ना? तुमचे कितीही चाकी इंजिन असले तरी ते फेल होत आहे ना? दोन पक्ष संपवायचे म्हणून तुम्ही आलात, पण या प्रयत्नात तुम्ही भाजपलाच संपविले, असा हल्लाबोल महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या मुद्द्यावरून उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

मूळ भाजपचे अनेक नेते आज कुठेही दिसत नाहीत. भाजपचे प्रवक्ते म्हणून जे नेते समोर दिसत आहेत, ते कुठून ना कुठून आयात केलेले आहेत. विधानसभेचे अध्यक्षही दोन पक्ष फिरून भाजपमध्ये गेले. पुन्हा तिसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

लोकसभा निवडणुकीत पाचव्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि नाशिक परिसरातील लोकसभा जागांसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी बुधवारी लोकमत कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी, लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव आणि डिजिटल टीमच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी महायुती सरकारवर चौफेर टीका केली. 

"भाजपसोबत एकनाथ शिंदे गटाचे आमदार गेले आणि नंतर अजित पवार यांच्या गटाचेही आमदार गेले. भाजपला सर्वाधिक धोका कोणत्या गटाकडून आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, "भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच सगळ्यांना धोका आहे. मी भाजपच्या नेत्यांची एक यादी तुम्हाला देतो, आताच्या काळात तुम्हाला भाजप नेत्यांची प्रतिक्रिया घ्यायची असेल तर कोणती नावे समोर येतात? बाहेरच्या पक्षांतून आलेले नेतेच पुढे आहेत. सगळेच्या सगळे २०१९ मध्ये आयात केलेले आहेत. 

राज ठाकरेेंवरही भाष्य

माझ्या पक्षाचे सहा नगरसेवक फोडून फोडाफोडीच्या राजकारणाला उद्धव ठाकरे यांनीच सुरुवात केली होती, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच एका सभेतून केला. या आरोपाला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करून २० वर्षे झाली. मात्र एक अशी घटना सांगा की, आम्ही त्यांच्यावर टीका केली. काही नात्यांवर आपण बोलायचे नसते, असे घरातून सांगितले आहे. आमच्याकडे मनसेचे जे नगरसेवक आले ते नंतर निवडून आले, त्यातले काही आमदारही झाले होते. आता आमच्यातून गेलेल्या गद्दारांची जशी स्थिती झालीय, तशी स्थिती त्या नगरसेवकांची झाली नव्हती," असे स्पष्टीकरण आदित्य यांनी दिले.

भाजपचे मूळ कार्यकर्ते कुठे आहेत?

पंकजाताईंना आता उमेदवारी दिली असली तरी त्यांच्या मनात काय खदखद आहे ती त्यांना विचारा, पूनमताई कुठे आहेत ते विचारा, प्रकाश मेहता कुठे आहेत, राज पुरोहित कुठे आहेत ते विचारा, एकनाथ खडसेंच्या बाबतीत काय करण्यात आले? दोन पक्ष संपविण्यासाठी मी आलो, असे तुम्ही म्हणालात. पण त्या प्रयत्नात तुम्ही भाजपलाच संपवले. मूळ भाजप आता कुठे आहे? आताच्या सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत ते २०२२ मध्ये आयात केलेले आहेत. त्यांच्यासोबतचे १० आमदार मंत्री झाले. अजित पवारांसोबतचे ९ आमदार मंत्री झाले. भाजपचे १० मंत्री आहेत, पण त्यातलेही फक्त ६ मूळचे भाजपचे आहेत. स्वत:च्या इगोसाठी आमचे सरकार पाडलं, पण भाजपचे मूळ कार्यकर्ते कुठे आहेत?" असा सवाल आदित्य यांनी केला.

ठाणे किंवा कल्याणमधून लोकसभा निवडणुकीला का उभे राहिला नाहीत?

"पिक्चर अभी बाकी है! लोकसभा हा एक आवडता प्लॅटफॉर्म आहेच, तुम्ही तिथे जे बोलता ते देशभर जाते. मात्र त्याच बरोबरीने आपला महाराष्ट्र आहे. सध्याच्या स्थितीत तरी महाराष्ट्रात मी काम करणे योग्य आहे. कारण या लोकांना ज्या प्रकारे मागील अडीच वर्षांत महाराष्ट्र मागे नेला आहे, आमचे महाविकास आघाडीचे आल्यानंतर जी काही जबाबदारी मिळेल, ती आमदार म्हणून असेल किंवा इतर काही...त्या माध्यमातून मला महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवायचा आहे, देशभर पोहोचवायचा आहे.  कोर्टाकडून बाद झाले नाहीत, तर एकनाथ शिंदेंना निवडणूक लढता येईल. भाजपा जर डोक्यावर बसले नाही तर निवडणूक राज्यात होईल. पहिले चॅलेंज देतो की माझ्याशी महाराष्ट्राबद्दल चर्चा करा. जिथून लढवायची तिथून निवडणूक लढवू," अशी भूमिकाही आदित्य ठाकरे यांनी मांडली.

आपल्याकडे राज्य, जिल्हे, तालुके, त्यांची संस्कृती, कला, परंपरा, पद्धती, भाषा हे सगळे भारत म्हणून एकत्र आणले आहे. पण आज जीएसटी, ईडी, आयटी, सीबीआय, इतर काही बंधने लादली जात आहेत. आपला आवाज दिल्लीत ऐकला जातोय का, याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे देशात मिलीजुली सरकार हवे, ज्यात प्रत्येक राज्याला प्रतिनिधित्व असते आणि सगळ्यांची ‘मन की बात’ ऐकते. विकास सगळ्यांचाच व्हावा.

२१ जागांवरील उमेदवार निवडीवर तुम्ही समाधानी आहात का?

महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २१ जागा मिळाल्या आहेत. या २१ जागांवरील उमेदवार निवडीवर तुम्ही समाधानी आहात का, या प्रश्नावर आदित्य म्हणाले की, "उमेदवार निवडीवर आम्ही नक्कीच समाधानी आहोत आणि फरक आहेच आहे की, आमचे जे २१ उमेदवार आहेत ते पक्षातून आले आहेत, जनतेतून आले आहेत, मुंबईत ठरवले गेले आहेत, मातोश्रीवर ठरवले गेले आहेत. मात्र गद्दार गँगचे जे उमेदवार आहेत ते ठरवण्यासाठी त्यांना किती वेळा दिल्लीत जावे लागले? किती वेळा बाहेर थांबावे लागले? आणि मुख्य म्हणजे कोणत्या पक्षाने ते उमेदवार ठरवले? त्यांच्याकडे तर काही लोक असे आहेत की ज्यांना उद्धवसाहेबांनी पाच-सहा वेळा खासदार बनवले, मात्र तिकडे गेल्यावर राखी बांधूनही त्यांना तिकीट मिळाले नाही."

 

टॅग्स :आदित्य ठाकरेआदित्य ठाकरेमुंबईलोकमतलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४