लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी शहरात सभा झाली. त्यांच्या आगमनाने कल्याण शहर ‘नरेंद्र मोदी’मय झाल्याचे पाहायला मिळाले. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असा विश्वास यावेळी उपस्थित काही महिलांनी व्यक्त केला.
भगव्या रंगाच्या साड्या परिधान करून, हातात मोदींचे कटआऊट, डोक्यावर पक्षाचे चिन्ह असलेली टोपी असा जथ्था पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या दिशेने सकाळपासूनच जात होता. कल्याण, भिवंडी, डोंबिवली, टिटवाळा याचबरोबर आसपासच्या परिसरातील अनेक नागरिकांची रीघ दुपारी दोननंतर सभास्थळी वाढताना दिसत होती. यामध्ये आबालवृद्धांसह महिला आणि तरुणांचा सहभाग होता. येणाऱ्या नागरिकांना सभेच्या ठिकाणी पोहोचणे सोपे व्हावे म्हणून जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त होता.
प्रत्येकाची अंगझडती घेऊनच त्यांना आत प्रवेश दिला जात होता. सभेच्या ठिकाणी पाणी घेऊन जाण्यास मज्जाव केला होता. मात्र सभास्थळी पाणी, बिस्कीट आणि स्नॅक्सची व्यवस्था करण्यात आली होती.
सभा स्थळाजवळ महायुतीसह त्यांच्या मित्रपक्षाचे झेंडे लागले होते. पंतप्रधान मोदी जेव्हा सभास्थळी पोहोचले तेव्हा ‘मोदी-मोदी’च्या जयघोषाने परिसर दणाणून निघाला. नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. या सभेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात विशेष करून मुस्लिम महिलांचा सहभाग होता. सभास्थळाच्या बाहेरील रस्त्यावरही मोदींचे भाषण ऐकण्यासाठी अनेक महिला बसल्या होत्या.
मोदी की चाय
पश्चिमेकडील ठाणकरपाडा परिसरात मागील आठ वर्षांपासून राजा सावरगावकर हे चहा विकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी चाहता असल्याने ‘मोदी की चाय’ विकत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मोदींच्या सभास्थळी ते आपला कटआऊट घेऊन आले होते.
सेल्फी पॉईंटवर चाहत्यांची गर्दी
सभेच्या ठिकाणी मोदींचा कटआऊट लावण्यात आला होता. त्याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. यामध्ये तरुणांसह महिलांची गर्दी लक्षणीय होती.
मोदींच्या काळात मला व्यवसायासाठी स्वनिधी कर्ज मिळाले. मोदींनी पंतप्रधानपदाची हॅट्ट्रीक करावी, अशी माझी इच्छा आहे. - अजित साबळे, मोहने आंबिवली
मोदी पुन्हा निवडून आल्यास तरुणांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावावा. सरकारी नोकरीत तरुणांना स्थान मिळावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. - अमर सोनावणे, कल्याण