गांबियातली ही फ्युजन सिंगर सध्या जगभर गाजतेय ती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:26 PM2019-11-28T12:26:04+5:302019-11-28T12:27:09+5:30

गांबिया नावाचा दक्षिण आफ्रिकी देश. अतिशय मागास. तिथली ही गायिका. तिनं कोरा हे वाद्य तर पुनरुज्जीवित केलंच; पण आता तिचं फ्यूझन म्युझिक अनेकांना वेड लावतं आहे.

meet Gambia's Sona Jobarteh , fantastic musician | गांबियातली ही फ्युजन सिंगर सध्या जगभर गाजतेय ती का?

गांबियातली ही फ्युजन सिंगर सध्या जगभर गाजतेय ती का?

Next
ठळक मुद्देअरेबिक स्टाइलचाही तिच्या गाण्यावर प्रभाव आहे.  तिचं हे फ्यूझन संगीत आता जगभर गाजतं आहे.

- शिल्पा दातार-जोशी

Hmmmm, suba saya
in the darkness of death
the orphans cry
My mother told me 
that life is difficult
some are laughing
while others cry everyday.

‘सुबा साया’ या आपल्या प्रसिद्ध अल्बमचे हे बोल, ती आफ्रिकी भाषेत प्रेक्षकांसमोर सादर करत असते. अर्थातच त्या बोलाचा अर्थ कळत नाही; पण आशिया, आफ्रिकेसारख्या विकसनशील देशांत अज्ञान, गरिबी, प्रथांमुळे माणसाचा रोजच्या जगण्यातला संघर्ष तिच्या गाण्यातून आत झिरपतो. हेच तिच्या गाण्याचं वैशिष्टय़. ग्रीऑट घराण्याचा पारंपरिक संगीत व वाद्याचा सात शतकांचा वारसा तिनं 
पुनरु ज्जीवित केलाय. 
सोना जोबार्तेह तिचं नाव.
उच्च अभिरुचीचा पेहराव, हाताच्या कोपरार्पयत येणार्‍या बाह्यांचा कुर्ता, आफ्रिकी धाटणीची केश व वेशभूषा, सडपातळ, गडद रंगाची सोना श्रोत्यांसमोर येते. तिच्या हातातून खांद्यावर धरलेलं वाद्य इतकं जड असतं की तिला पेलवेल कसं असं वाटतं. हे वाद्य म्हणजे पश्चिम आफ्रिकेचं पारंपरिक वाद्य कोरा. आपल्या पाच वर्षाच्या मुलाच्या सिद्दिकीच्या बुटांचे बंद जितक्या सहजतेनं लावेल, तितक्या सराईतपणे तिच्या हातांची बोटं कोराच्या 21 तारांवरून लयबद्धतेनं फिरू लागतात. त्यातून स्वर उमटतात, हे स्वर आतून आलेले असतात. या स्वरांबरोबर आपल्या मृदू आवाजाने सोना जोबार्तेह गाऊ लागते. गाण्याचे बोल कळत नाहीत, कदाचित ते मँडिंका भाषेतले असतात किंवा आरबी भाषेतले; पण ते आपल्या हृदयार्पयत पोहोचतात. पुरुषप्रधान असणारं कोरा हे अतिशय जड आणि अवघड वाद्य वादन करणारी सोना ही जगातील पहिली महिला आहे. केवळ हे वाद्य वाजवून ती थांबत नाही, तर त्याच्या प्रचार व प्रसाराचं, शिक्षणाचं मोठं काम ती करते आहे. आफ्रिकी वाद्य परंपरा पुढे नेण्याचा नेटानं प्रयत्न करते आहे.
सोना जोबार्तेह ही पश्चिम आफ्रिकी वंशाची गायिका आहे. आफ्रिकी व पाश्चिमात्य विविध वाद्य वाजवणारी उत्कृष्ट वादक आहे. ती 1983 साली लंडनमध्ये जन्माला आली. पश्चिम आफ्रिकेतल्या कोरा वादन करणार्‍या पाच प्रमुख घराण्यांपैकी तिचं एक घराणं. गांबिया या आफ्रिका खंडातील सर्वात छोटय़ा देशाचं प्रतिनिधित्व करणार्‍या सोनाची आई ब्रिटिश, तर वडील आफ्रिकी. तिला आणि गांबियाला जोडलं ते कोरा या तंतुवाद्यानं. कोरा या वाद्यात पारंगत असलेल्या अमानू बनसंग जोबार्ते यांची ती नात. 21 तारा असलेल्या या वाद्याचा वारसा वडिलांकडून मुलाकडे येतो, तसा तो आजोबांकडून सोनाच्या वडिलांकडे आणि त्यांच्याकडून सोनाकडे आला. मँडिंका जमातीतील लोक ड्रम वाजवणं तसंच कोरा या वैशिष्टय़पूर्ण वाद्याचं वादन करत. या वाद्याची परंपरा ग्रीऑट या नावापाशी येऊन थांबते. तो पश्चिम आफ्रिकेतील प्रसिद्ध इतिहासकार, कथाकार, कवी, संगीतकार होता. ग्रीऑट म्हणजे मुखोद्गत परंपरांचं भांडार. शाही खानदानाचा सल्लागार. ग्रीऑट नंतर मालीहून गांबियाला 1915 साली स्थलांतरित झाला. या घराण्यातच पुढं सोना जन्माला आली.
घरातच वारसा असल्यानं वयाच्या तिसर्‍या वर्षापासून तिनं आपल्या अकरा वर्षाच्या  भावाकडून कोरावादन, संगीत शिकायला सुरुवात केली. त्याच्याबरोबर व वडिलांबरोबर ती लहानपणी कितीतरी वेळा गांबियाला गेली. गांबियाला आजीनं तिच्या हातात पहिल्यांदा ‘कोरा’ दिलं. ती अवघी चार वर्षाची असताना लंडन येथील जाझ कॅफेमध्ये तिचा पहिला परफॉर्मन्स झाला. तेव्हापासून ती जगभर कार्यक्रम करते आहे.
 पाश्चिमात्य शास्त्नीय संगीत शिकताना, तिथली वाद्यं वाजवताना काहीतरी अपुरं आहे, असं तिला वाटत असे. जेव्हा तिनं व्यावसायिकदृष्टय़ा कोरा हे वाद्य हातात घेतलं, आफ्रिकी मातीतलं पारंपरिक संगीत सादर करायला सुरुवात केली तेव्हा खर्‍या अर्थाने तिला तिच्या गाण्यातला ‘सोल’ सापडला. 
ती गांबियाला जात असे तेव्हा तिथल्या वस्त्यांमध्ये फिरताना तिथल्या भाषेचा उच्चार करायला शिकली, अस्खलित बोलायला शिकली. संगीतशैलीच्या मिलाफाने स्वतर्‍ची वेगळी शैली (फ्यूझन) निर्माण केली. अरेबिक स्टाइलचाही तिच्या गाण्यावर प्रभाव आहे. 
तिचं हे फ्यूझन संगीत आता जगभर गाजतं आहे.
ती म्हणते, ‘मायभूमीत आल्यावर एका अर्थानं वाईट वाटलं, माझ्या पिढीला कोरा संगीत माहीत नव्हतं. ते इथल्या तरुण पिढीसह जगभरातल्या तारुण्याला कळावं, गांबियाचा सुंदर सांगीतिक वारसा समजावा म्हणून मी प्रय} करते आहे.’



( शिल्पा मुक्त पत्रकार आहे.)
 

Web Title: meet Gambia's Sona Jobarteh , fantastic musician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.