जगाच्या इतिहासाचा नकाशा....भूगोलचे नकाशे आपण पाहतो, इतिहासाचा नकाशा पाहिलाय कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 03:00 IST2017-11-30T03:00:00+5:302017-11-30T03:00:00+5:30
एखादं ठिकाण शोधायला आपण आताशा गूगल मॅप्स वापरतो. जीपीएस लावतो. एखाद्या अनोळखी शहरामध्ये नेमकी जागा शोधायची तर ते अगदीच परफेक्ट टूल आहे. पण हे झाले जागा शोधण्याचे नकाशे. सगळेच नकाशे आपल्याला कोणत्या रस्त्यावर उजवीकडे वळायचं आहे हे सांगण्याइतपत मर्यादित नसतात.

जगाच्या इतिहासाचा नकाशा....भूगोलचे नकाशे आपण पाहतो, इतिहासाचा नकाशा पाहिलाय कधी?
- प्रज्ञा शिदोरे
एखादं ठिकाण शोधायला आपण आताशा गूगल मॅप्स वापरतो. जीपीएस लावतो. एखाद्या अनोळखी शहरामध्ये नेमकी जागा शोधायची तर ते अगदीच परफेक्ट टूल आहे. पण हे झाले जागा शोधण्याचे नकाशे. सगळेच नकाशे आपल्याला कोणत्या रस्त्यावर उजवीकडे वळायचं आहे हे सांगण्याइतपत मर्यादित नसतात. नकाशे आपल्याला एखाद्या नव्या भूभागाची ओळख करून देतात. तिथला भूगोल आणि अर्थातच इतिहासही सांगत असतात. ते आपल्यालाच आपली गोष्ट सांगून भविष्यातल्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी तयार करत असतात. माझं तर अशा वेगवेगळ्या नकाशांवर प्रेम आहे! नकाशे हा एक खरंच विलक्षण प्रकार असतो. मी लहान असताना तर आमच्याकडे एक भलामोठा जगाचा नकाशा होता. अनेकदा मी आणि माझी बहीण त्या नकाशावर बसून वेगवेगळे देश ओळखण्याचा खेळ खेळायचो!
असेच काही कमाल नकाशे तयार केले आहेत थॉमस टेल्समन या इतिहास तज्ज्ञाने. त्यातलाच एक म्हणजे त्यानं तयार केलेला भारताचा नकाशा. हा नकाशा साधासुधा नाही. या नकाशामध्ये थॉमसने पहिल्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंतचा भारताचा भूगोल वेगवेगळ्या नकाशांमधून दाखवला आहे. हा भूगोल म्हणजे कोणी, कुठे, कधी राज्य केलं याचं रेखाटन. या नकाशांमधून त्यामुळे आपल्याला भारताचा बदलता इतिहास बघायला मिळतो. थॉमसच्या वीस वर्षांच्या अनुभवांनंतर तो म्हणतो की, त्यानं आजपर्यंत जगातील अनेक देशांचे नकाशे अशाप्रकारे तयार केले आहेत. पण भारताबद्दल मांडणी करणं त्याच्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं.
थॉमसची ‘वर्ल्ड हिस्टरी मॅप्स’ही वेबसाइट. तिथं भारतासंबंधी तो सांगतो, भारतीय उपखंडाने आजपर्यंत अनेक राजवटी अनुभवल्या आहेत. या भूमीवर अनेक राजवटींनी जन्म घेतला, त्या रु जल्या, मोठ्या झाल्या आणि पुढे लयास गेल्या. पण या प्रत्येक राजवटीने आपल्या या प्रवासात या भूमीवर आपली मोहोर उठवली आणि जाताजाता इथली संस्कृती आणि इथे राहणाºया लोकांच्या अस्मितेला वळण देत गेल्या.
भारताचा नकाशा सुरू होतो तो शक, सातवाहन या वंशांपासून. जसे आपण पुढची शतकं पाहत जातो तसं तसं आपल्याला कोणी, कोणाची, किती भूमी काबीज केली याचा अंदाज यायला सुरुवात होते. थॉमसचे हे नकाशे आपल्याला भारताच्या इतिहासाची एका नव्या रूपात ओळख करून देतात.
तेव्हा इतिहासात, भूगोलात किंवा आपली जडणघडण कशी होत गेली, यामध्ये रस असलेल्यांनी हे भारताचे नकाशे नक्की वाचा. त्याच्या वेबसाइटवर त्याने जगातल्या वेगवेगळ्या भागांचे असेच नकाशे तयार केले आहेत. भारताचे नकाशे पाहिलेत की तुम्हाला तेही नकाशे नक्कीच पाहावेसे वाटतील.
नक्की वाचा
वर्ल्ड हिस्टरी मॅप्स - http://www.worldhistorymaps.info/index.html