लॉकडाउननंतर व्यायाम करू असं ठरवताय , मग ते 'या' कारणांमुळे नाही होणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 13:29 IST2020-05-14T13:27:19+5:302020-05-14T13:29:58+5:30
आता हे लॉकडाउन संपलं की, असा व्यायाम करतो, जीम लावतो, मॅराथॉन पळतो, असं काही तुमच्या मनात असेल तर तातडीनं काढून टाका आणि आजच्या आज घरच्या घरी कसा व्यायाम करता येईल याचा विचार करा. त्यासाठी या काही आयडिया.

लॉकडाउननंतर व्यायाम करू असं ठरवताय , मग ते 'या' कारणांमुळे नाही होणार !
- प्राची पाठक
व्यायाम हा एक गुळगुळीत झालेला शब्द आहे. व्यायाम म्हणजे काय तर कधीही पूर्ण न झालेला आणि वारंवार केलेला एक संकल्प.
अर्थात याला काही अपवाद आहेत. त्यांनी यातून स्वत:ला वगळावं.
मात्र अनेकजण हे पहिल्या व्यायामचा संकल्प करूकॅटेगरीतलेच. मग अपूर्ण संकल्पांचे जोक्स सुरू होतात, नाहीतर मग आपण कसं जिम लावलं पण गेलोच नाही वगैरे सांगून हसून जिरवलं जातं.
त्यात सिक्स पॅकची आस. त्या सगळ्यांनाच एका रात्नीत सलमान, ऋतिक, रणवीर वगैरे व्हायचं असतं. त्यामुळे चकाचक, महागडय़ा जिमची मेंबरशिप घेतल्याशिवाय आपलं व्यायामाचं स्वप्न पूर्णच होणार नाही, अशी आडकाठी आपणच स्वत:ला टाकून ठेवत असतो. आपल्याही नकळत.
आणि आता तर अनेकांना वाटू लागलं आहे की, आपण व्यायाम करूशकत नाही कारण जिम नाही. बाहेर जायची परवानगी नाही. सायकलिंगला, रनिंगला जाता येत नाही.
आता आपल्या अनफिट तब्येतीचं आणि व्यायाम न करण्याचं खापर सरळ लॉकडाउनवर फोडलं जातंच.
- आता लॉकडाउन हे झालं निमित्त. पण सगळ्यांची व्यायामाची गाडी अशीच कुठेतरी अडकलेली असते.
एकदम खूप काही सुरू करायचं किंवा काहीच करायचं नाही.
त्यापेक्षा आपली लाइफस्टाइल आपण थोडी लक्षात घेतली तर?
आपण उठतो केव्हा, झोपतो केव्हा, किती वेळ झोपतो, दिवसातून किती वेळा आणि काय खातो, असे प्रश्न स्वत:लाच विचारायचे.
आपला दिवसातला किती वेळ बैठं काम करण्यात, मोबाइल, टॅब हातात घेऊन बसण्यात जातो? शरीराची काही हालचाल होईल, अशी किती कामं आपण दिवसभरात करतो?
घरकामात आपला कसा आणि किती सहभाग असतो? दिवसभर आपण किती धावपळ करतो, हे सर्व जीवनशैलीशी संबंधित प्रश्न स्वत:लाच विचारायचे.
त्यातून आपलं एक हेल्थ प्रोफाइल तयार होईल. एक रेकॉर्ड बनेल.
व्यायामासाठी नेहमीच महागडय़ा जिमला जायची गरज नसते. आपण लहान-सहान गोष्टींतून शरीर हालचाली करत काही गेम्स, काही अॅक्टिव्हिटीज यांच्या माध्यमातून व्यायामाची सवय स्वत:ला लावू शकतो. घरच्या घरी काही व्यायाम प्रकार सुरू करू शकतो.
आणि त्यासाठी मुहूर्ताची, लॉकडाउन संपण्याची गरज नाही.
आणि मनात आणलं तर घरातल्या घरात, बिनपैशाचा व्यायाम करूशकतो.
त्यासाठी काय करता येईल?
1. पिंग पॉँग हा खेळ, म्हणजे एखादा लहानसा चेंडू टेबल टेनिससारखा भिंतीवर खेळायचा. कोणाला आवाजाचा त्नास होऊ नये म्हणून चक्क हलका, छोटासा चेंडू घ्यायचा आणि भिंतीवर टेबल टेनिस खेळतोय अशा प्रकारे खेळायचा. त्याने कमरेचा, हातापायांचा खूपच छान व्यायाम होतो. एखादं दोन गाणी हेडफोनवर ऐकतदेखील हा व्यायाम करता येतो. दिवसातून दहा दहा मिनिटांचे ब्रेक घेत असा व्यायाम चार, सहा वेळा करता येतो.
2. घरात, घराबाहेर एखादा कापडी हँगिंग बॉल टांगून ठेवून त्यावर व्यायाम सुरू करता येतो.
3. किक बॉक्सिंग घरीच सुरू करता येतं. ती बॅगदेखील घरीच बनवून घेता येते. आपल्याला आवडतील आणि कुठेही खेळता येतील, विशेष आवाज होणार नाही, इतरांना त्नास होणार नाही, असे खेळ खेळत व्यायामाला सुरुवात करता येते.
4. व्यायाम म्हणून न करता शारीर हालचाली वेगात होतील, अशा गेम्सच्या माध्यमातून सुरू करता येतो. हळूहळू वेळ वाढवत नेता येतो. त्यात गेम्स खेळायच्या आधी, मधल्या वेळात काही वॉर्म अप प्रकार, रनिंग वगैरे जोडत जाता येतं.
5. एकटय़ाने बॅडमिंटन खेळून बघा. दोन्ही हातात दोन रॅकेट्स घेऊन आपणच खेळायचं. जाम घाम निघेल.
6. तसंच एखादी डिश, एखादी रिंग हवेत उडवत खेळता येतं. एकातून अनेक छोटे-मोठे गेम्स आपले आपल्याला सापडत जातात. ते खेळायच्या निमित्ताने आपण बसून राहणं कमी करतो. शरीर हालचाली सुरू करतो. हळूहळू त्यात इतर मुख्य व्यायाम प्रकार जोडत जाता येतात. व्यायामाचा कंटाळा येत नाही. तासन्तास आपण या गेम्समध्ये रमून जातो, ते वेगळंच.
7. हे गेम्स घरच्या घरी तयार करता येऊ शकतात. अमुक गोष्ट विकत मिळाली, तरच माझं तमुक सुरू होईल, असं अडून बसायची गरज नसते. आपला स्टॅमिना वाढत गेला की रेग्युलर व्यायाम करायला, शिकायला आपल्याला आवडायला लागतं, हा फायदाही असतोच.
8. अगदीच हवं असेल तर नेटवर वॉक अॅट होम किंवा घरच्या घरी व्यायाम करण्याचे काही प्रकारही पाहून, त्यात आपल्याला काय आवडेल, निभेल याचा विचार करून निवडताही येईल.
9. कोरोना लॉकडाउनमध्ये तब्येतीची किंमत कळली असेल तर व्यायाम करू करू असं न करता घरच्या घरी करायला सुरुवात करा.
10. आणि व्यायाम ही रोज करण्याची गरज आहे हेही लक्षात ठेवा.
(प्राची मानसशास्नसह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्नची अभ्यासक आहे.)