World Champion Prashant more loss in final; Irshad Sahamad won title in 8th international carrom tournament | विश्वविजेत्या प्रशांतचा पराभव; इर्शाद अहमदने जिंकला किताब
विश्वविजेत्या प्रशांतचा पराभव; इर्शाद अहमदने जिंकला किताब

पुणे -  नागपूरच्या इर्शाद अहमदने आपल्या कारकिर्दीतला पहिला आंतरराष्ट्रीय किताब जिंकताना विश्वविजेत्या प्रशांत मोरेचा तीन सेट चालेलेल्या अटीतटीच्या लढतीत ३-२५, २५-१४ आणि २५-२४ असा पराभव केला. या विजयासह त्यानं ८ व्या आंतरराष्ट्रीय कॅरम  फेडरेशन चषक स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. त्याने उपांत्यपूर्व फेरीत माजी जगज्जेता निशांत फर्नांडो (श्रीलंका) माजी राष्ट्रीय विजेता आणि आंतराष्ट्रीय जहीर पाशा याचा उपांत्यफेरीत अशा दोन मोठ्या शिकारी केल्या होत्या. इर्शादला आजपर्यंत केवळ एकच राष्ट्रीय विजेतेपद जिंकता आले होते. हीच त्याची जमेची बाजू होती. 

भारताला पुरुष आणि महिला विभागातली सर्व पदके मिळणार हे नक्की होते कारण उपांत्य फेरीत देशातले कोणीच पोहोचले नव्हते. महिलांमध्ये मात्र काही उलट फेर झाला नाही. विश्‍वविजेत्या एस. अपूर्वाने काहीशा अनपेक्षितपणे अंतिम फेरीत पोहचलेल्या आयेशा साजिदवर महत्प्रयासाने १०-२५, २५-२२ आणि २५-६ अशी मात केली. आयेशाने दुसरा सेट २२-९ अशा आघाडीनंतर हातचा गमावला त्यापाठोपाठ सामना देखील. अपूर्वाने मिळालेले जीवदान साजरे करताना तिसर्‍या सेटमध्ये जी २०-० अशी केवळ तीन बोर्डात आघाडी घेतली तेथेच विजेतेपदाचा निकाल स्पष्ट झाला.

प्रशांतने पहिल्याच बोर्डमध्ये  ब्रेक -टू-फीनीश केला तेव्हा इर्शाद चांगलाच हादरला. त्याच्यासाठी हे व्यासपीठ नवेच होते. मात्र दुसर्‍या गेममध्ये त्याने स्वतःला सावरले. त्याने १०-० अशी आघाडी घेत भक्कम व सावध सुरुवात करत दुसर्‍या सेटचाच नव्हे तर सामना जिंकण्यासाठी पाया रचला. त्यानंतर आठ गुणांचा पाचवा बोर्डही जिंकला. तिसर्‍या सेटमध्ये तो ०-६ असा सरुवातीसच पिछाडीवर पडला. पण त्याने हळूहळू जम बसविला. त्याच्या कट-शॉटस् ला मग वेगळीच धार आली. प्रशांतने या सेटमध्ये एक  ब्रेक -टू-फीनीश   केला व १९-६ ही पिछाडी १९-१८ अशी भरून काढली. त्यानंतर २४-२० अशी आघाडी घेतली. मात्र डगमगून न जाता इर्शादने स्वतःच्या ब्रेकवर मोठा बोर्ड जिंकत विजयश्री खेचून आणली.राजेश गोहिल आणि रश्मी कुमारी यांनी तिसरे स्थान पटकविताना अनुक्रमे झहीर पाशा आणि के नागज्योती यांना पराभूत केले ते २५-०, १०-२५, २५-१५ आणि २५-१३, २५-१६ अशा फरकाने

महत्वाचे निकाल
पुरूष एकेरी तिसरे स्थान
राजेश गोईल वि. वि. जहीर पाशा- २५-०, १०-२५, २५-१५
उपांत्य फेरी -
इर्शाद अहमद वि. वि. जहीर पाशा २५-१४, १८-२५, २५-२३
प्रशांत मोरे वि. वि. राजेश गोहिल २५-२४, ६-२५, २५-२१

महिला एकेरी तिसरे स्थान
रश्मी कुमारी वि. वि. के. नागज्योती- २५-१३, २५-१६
उपांत्य फेरी
एस. अपूर्वा वि. वि. के. नागज्योती २५-१५, २५-२२
आयेशा मोहमंद वि. वि. रश्मी कुमारी १५-२५, २५-१३, २५-२०
 

Web Title: World Champion Prashant more loss in final; Irshad Sahamad won title in 8th international carrom tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.