विराट, रोहित यांनी अजूनही कसोटी खेळले पाहिजे; दिलीप वेंगसरकर यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:20 IST2026-01-09T17:17:05+5:302026-01-09T17:20:48+5:30
'टी-२० क्रिकेटचा कसोटी क्रिकेटवर परिणाम झालेला नाही'

विराट, रोहित यांनी अजूनही कसोटी खेळले पाहिजे; दिलीप वेंगसरकर यांचे मत
राजापूर : तीनही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जात आहे ही चांगली बाब आहे. प्रत्येक खेळाडूने या सर्व प्रकारामध्ये जुळवून घेऊन खेळले पाहिजे. भारतीय संघातील विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे खूप माेठे याेगदान आहे. त्यामुळे त्यांनी अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये खेळले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार, राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी राजापूर येथे मांडली.
राजापुरातील माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभात महादेव कुलकर्णी हे वेंगसरकर यांचे नात्याने मामा असल्याने त्यांच्या आजोळच्या आठवणी त्यांनी शेअर केल्या. वेंगसरकर यांच्यासमवेत महाराष्ट्र क्रिकेटचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ, मिलिंद कुलकर्णी हेही उपस्थित हाेते.
राजापूरमध्ये आल्यानंतर वेंगसरकर यांनी प्रथम आपल्या जन्मस्थानावर जाऊन आजूबाजूला फिरून भरपूर फोटो काढले. त्यानंतर ज्याठिकाणी त्यांचे बालपण गेले त्या इमारतीत सध्या कार्यरत असलेल्या लोकमान्य सहकारी सोसायटीच्या कार्यालयात बसून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वेंगसरकर म्हणाले की, पूर्वीचे क्रिकेट आणि आजचे क्रिकेट यामध्ये मोठा फरक झाला आहे. पूर्वी क्रिकेटमध्ये पैसा नव्हता त्यामुळे नोकरी सांभाळून क्रिकेट खेळावे लागत होते. मात्र, अलीकडच्या काळात क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये करिअर करणाऱ्या खेळाडूला चांगली संधी असल्याचे ते म्हणाले. महिलांनाही क्रिकेटमध्ये चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
टी-२० क्रिकेटचा कसोटी क्रिकेटवर परिणाम झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जाणे ही चांगली बाब असल्याचे त्यांनी सांगितले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे क्रिकेटला मोठे योगदान असून, त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अजून खेळले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
लाॅर्ड्सवरची खेळी अविस्मरणीय
१९८६ साली लॉर्ड्सवर केलेल्या नाबाद १२६ धावांची आठवण करून दिली. त्या शतकी खेळीने भारताला लॉर्ड्सवर पहिला विजय मिळविता आला होता. आपली शतकी खेळी देशाला विजयी करून गेली ते मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.