दिएगो मॅरेडोना यांचे निधन, फुटबॉलच्या एका युगाची अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 04:37 AM2020-11-26T04:37:01+5:302020-11-26T04:37:28+5:30

वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतला अखेरचा श्वास

Veteran Argentine footballer Diego Maradona dies | दिएगो मॅरेडोना यांचे निधन, फुटबॉलच्या एका युगाची अखेर...

दिएगो मॅरेडोना यांचे निधन, फुटबॉलच्या एका युगाची अखेर...

googlenewsNext

ब्युनास आयर्स: अर्जेंटिनाचे माजी दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे वयाच्या ६० व्या वर्षी बुधवारी  हृदयविकाराच्या झटक्यामुळे  निधन झाले.  १९८६ साली आपल्या बहारदार खेळाने अर्जेंटिनाला विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅरेडोना यांचे नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झाले. मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एका अपघातानंतर मॅरेडोना यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रियाही झाली. यातून सावरल्यानंतर मॅरेडोना यांना ११ नोव्हेंबर रोजी   त्यांच्या घरी हलविण्यात आले होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मॅरेडोना यांच्या निधनामुळे  क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मॅरेडोना यांनी वयाच्या १६ व्या वर्षी फुटबॉल करिअरची सुरुवात अर्जेंटिनाच्या ज्युनियर संघाद्वारे केली. लवकरच ते फुटबॉलमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये सहभागी झाले. १९८६ चा फिफा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या खेळाडूची कारकीर्द जितकी शानदार तितकीच वादग्रस्त देखील ठरली. मॅरेडोनाने बोका ज्युनियर्स, नेपोली आणि बासिर्लोना या प्रख्यात संघांशिवाय अन्य संघाकडूनही खेळ केला. इंग्लंडविरुद्ध १९८६ साली झालेल्या स्पर्धेतील गोल फुटबॉलविश्व कधीही विसरू शकणार नाही. याच गोलला ‘हॅन्ड ऑफ गॉड’ असे संबोधले जाते. अनेक वर्षानंतर त्यांनी हेतूपुरस्सरपणे चेंडूला हात लावल्याची कबुली देखील दिली होती. त्याच सामन्यात त्यांनी चार मिनिटानंतर सुरेख गोल नोंदविला होता. फिफाने या गोलला फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोल संबोधले होते.
 

फुटबॉलच्या एका युगाची अखेर...
पेलेसोबतच जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंमध्ये गणना झालेले मॅरेडोना अवघ्या ६० वर्षांचे होते.  चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या खेळाडूने  व्यावसायिक खेळातून निवृत्त झाल्यानंतरही योगदान म्हणून राष्ट्रीय संघाचे कोच आणि व्यवस्थापकपद सांभाळले होते. अनेक  वर्षांपासून त्यांना कोकेन या अमली पदार्थाची सवय जडली होती. यामुळे शरीराचा लठ्ठपणा देखील वाढला होता. त्यांच्या निधनामुळे जगभरात शोक पसरला असून अर्जेंटिनाने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. सोशल मीडियावर या महान खेळाडूच्या अविस्मरणीय आठवणींचा अक्षरश: पाऊस पडत आहे. 
 

मॅरेडोनाची कृती कॅमेऱ्यात कैद

२२ जून १९८६ साली मेक्सिकोच्या अझटेका स्टेडीयमवर झालेल्या अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना मध्यांतरापर्यंत ०-० असा बरोबरीत सुरु होता. मध्यांतरानंतर मॅरेडोना यांनी अर्जेंटिनाकडून पहिला गोल झळकावला. परंतू हा गोल करत असताना मॅरेडोना यांचा हात बॉलला लागला होता. फुटबॉलच्या नियमानुसार मैदानातील पंचांनी यावेळी मॅरेडोना यांना येलो कार्ड दाखवून गोल नाकारणं गरजेचे होते. मात्र मॅरेडोना यांचा हात बॉलला लागला हे पंचांच्या दृष्टीपथात नव्हते आणि  व्हिडीओ रेफरल सिस्टीम उपलब्ध नसल्यामुळे मॅरेडोना यांचा हा गोल वैध ठरवण्यात आला. या गोलच्या आधारे अर्जेंटिनाने सामन्यात १-० अशी आघाडी घेतली.

सामना संपल्यानंतर अर्जेंटिनाने २-१ ने बाजी मारत विजेतेपदावर मोहर उमटवली होती. मॅरेडोना यांनी झळकावलेला दुसरा गोल हा फुटबॉलविश्वात ‘गोल ऑफ द सेंच्यूरी’ म्हणून ओळखला जातो. अंतिम सामना संपल्यानंतर पत्रकारांनी मॅरेडोना यांना पहिल्या गोलविषयी विचारले असता मॅरेडोना यांनी त्या गोलचे वर्णन केले.   सामन्यात रेफ्री म्हणून काम पाहणारे ट्युनिशीयाचे अली बेनासूर यांनी मॅरेडोना यांचा पहिला गोल वैध ठरवल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी याविरोधात नाराजी व्यक्त करत लाईन्समनच मत घ्यायला सांगितलं. परंतू दुर्दैवाने लाईन्समननेही मॅरेडोना यांच्या पारड्यात मत टाकले. मेक्सिकोचे फोटोग्राफर अलेजांड्रो ओजेडा यांच्या कॅमेऱ्यात मात्र मॅरेडोना यांची ही कृती कैद झाली होती.

 

Web Title: Veteran Argentine footballer Diego Maradona dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.