Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 21:18 IST2025-07-11T21:11:16+5:302025-07-11T21:18:46+5:30
अमेरिकच्या टेलरनं अप्रतिम खेळ करून दाखवत जोर लावला, पण शेवटी अल्कराझसमोर तो कमी पडला.

Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
Wimbledon 2025 Carlos Alcaraz Beats Taylor Fritz : विम्बल्डन २०२५ स्पर्धेतील पुरुष एकेरीतील पहिल्या उपांत्य फेरीतील लढतीत स्पॅनिश कार्लोस अल्काराझ याने टेनिस कोर्टवरील आपला दबदबा कायम राखत सलग तिसऱ्यांदा या ग्रँडस्लॅम स्पर्धेची फायनल गाठली आहे. नदालनंतर सलग तीन वेळा फायनलमध्ये पोहचणारा तो दुसरा स्पॅनिश टेनिसपटू ठरलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वयाच्या २२ व्या वर्षी विम्बल्डनमध्ये विजयी हॅटट्रिकचा डाव साधण्याची संधी
अमेरिकन टेनिसपटू टेलर फ्रिट्झचा ६-४, ५-७, ६-३, ७-६ (६) असा पराभव करून कार्लोस अल्काराझने वयाच्या २२ व्या वर्षी कारकिर्दीतील सहाव्या ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या दिशेनं वाटचाल केली आहे. मागील दोन वेळच्या विम्बल्डन चॅम्पियन असलेल्या कार्लोस अल्काराझनं २४ विजयासह तिसऱ्यांदा फायनलमधील प्रवेश पक्का केला आहे. २०२३ आणि २०२४ च्या विम्बल्डन स्पर्धेत त्याने नोव्हाक जोकोविचला पराभूत करून जेतेपद पटकावले होते. सलग तिसऱ्यांदा तो ही स्पर्धा गाजवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
अमेरिकन टेनिसपटूला मॅचमध्ये येण्याची संधी होती, पण....
फ्रिट्झला अल्काराझविरुद्ध पाचवा सेट जिंकण्याची दोन संधी होती, त्याने चौथ्या सेटच्या टायब्रेकरमध्ये ६-४ अशी आघाडी घेतली होती. पण अल्काराझने जबरदस्त कमबॅक करत सेटसह मॅच जिंकून या स्पर्धेतील आपली बादशाहत टिकवण्यासाठी पुढे वाटचाल केली. अमेरिकच्या टेलरनं अप्रतिम खेळ केला. पण शेवटी अल्काराझसमोर त्याचा निभाव लागला नाही.
अल्काराझसोबत फायनलमध्ये कोण दिसणार?
पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोविच आणि यानिक सिनर यांच्यात ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता रविवारी अल्काराझविरुद्ध जेतेपदासाठी अंतिम सामन्यासाठी कोर्टवर उतरल्याचे पाहायला मिळेल. गत स्पर्धेप्रमाणे पुन्हा जोकोविच-अल्काराझ यांच्यात लढत होणार की, सिनर फायनलमध्ये स्पॅनिश स्टारला टक्कर देणार ते पाहण्याजोगे असेल.