ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 09:41 IST2025-11-12T09:40:34+5:302025-11-12T09:41:51+5:30
Tragedy at ATP Finals 2025: एटीपी फायनल्स २०२५ टेनिस स्पर्धेदरम्यान दोन चाहत्यांचा मृत्यू झाला.

ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
इटलीतील ट्युरिन येथील इनल्पी अरेना येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठित एटीपी फायनल्स २०२५ टेनिस स्पर्धेदरम्यान एक अत्यंत दुःखद घटना घडली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी, सामन्याला उपस्थित असलेल्या दोन चाहत्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर, एटीपीने स्पर्धेदरम्यान झालेल्या दोन्ही प्रेक्षकांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करणारे अधिकृत निवेदन जारी केले आहे.
१० नोव्हेंबर रोजी दिवसाचा पहिला सामना इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टी आणि टेलर फ्रिट्झ यांच्यात होणार होता. मात्र, सामन्यापूर्वीच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीची बातमी समोर आली. एटीपीच्या अधिकृत निवेदनानुसार, स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या ७० आणि ७८ वर्षांच्या दोन चाहत्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने वैद्यकीय आपत्कालीन सेवा पुरवण्यात आली आणि त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, दुर्दैवाने उपचारादरम्यान या दोन्ही चाहत्यांचा मृत्यू झाला. इटालियन टेनिस फेडरेशन आणि एटीपी फायनल्सच्या संयोजकांनी या दुःखद घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
स्पर्धेचा अंतिम सामना १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सध्याचा जागतिक नंबर १ टेनिसपटू यानिक सिन्नर याने एटीपी फायनल्स २०२५ मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात दणदणीत विजयाने केली. सिन्नरने फेलिक्स ऑगर-अलियासिम विरुद्धचा सामना ७-५, ६-१ अशा दोन सरळ सेटमध्ये जिंकला. गेल्या वर्षीचे विजेतेपद जिंकणाऱ्या सिन्नरला आपले नंबर १ स्थान टिकवून ठेवण्यासाठी ही स्पर्धा जिंकावी लागेल. मात्र, स्पर्धेत सहभागी असलेल्या कार्लोस अल्काराझचे त्याच्यासमोर मोठे आव्हान असेल. जर अल्काराझने विजेतेपद सामन्यात स्थान मिळवले, तर सिन्नरला आपले नंबर १ रँकिंग गमावावे लागू शकते. जगातील अव्वल आठ खेळाडू या एटीपी फायनल्समध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांना प्रत्येकी चारच्या गटात विभागले गेले आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन खेळाडू उपांत्य फेरीत प्रवेश करतील.