टायगर वूड्सचा कार अपघात! भरधाव वेगातील गाडी ट्रकला धडकली आणि उलटली; अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याच्या संशयावरून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 09:28 IST2026-03-28T09:27:57+5:302026-03-28T09:28:18+5:30
Tiger Woods arrest Florida news : गोल्फचा महान खेळाडू टायगर वूड्स पुन्हा एकदा एका भीषण कार अपघातामुळे चर्चेत आला आहे. २७ मार्च २०२६ रोजी फ्लोरिडा येथे त्याच्या गाडीचा अपघात झाला असून, त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

टायगर वूड्सचा कार अपघात! भरधाव वेगातील गाडी ट्रकला धडकली आणि उलटली; अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याच्या संशयावरून अटक
जगातील दिग्गज गोल्फर टायगर वूड्स २७ मार्च रोजी फ्लोरिडा येथील ज्युपिटर आयलंडमध्ये एका कार अपघातात अडकला आहे. या अपघातात त्याची लँड रोव्हर कार उलटली असून, सुदैवाने तो यातून बचावला आहे. मात्र, पोलिसांनी त्याला अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणेच्या आरोपाखाली अटक केली आहे.
टायगर वूड्स त्याच्या लँड रोव्हर गाडीने भरधाव वेगाने जात असताना, त्याने एका 'प्रेशर क्लिनर ट्रकला' ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याची गाडी ट्रकच्या ट्रॉलीला धडकली आणि रस्त्यावर घसरून उलटली. मार्टिन काउंटीचे शेरीफ जॉन बुडेन्सीक यांनी सांगितले की, अपघातानंतर टायगर वूड्स हा सुस्त अवस्थेत दिसत होता. त्याने 'ब्रेथलायझर' टेस्ट केली असता त्यात अल्कोहोलचे प्रमाण आढळले नाही, परंतु त्याने लघवीची चाचणी देण्यास नकार दिला.
काय आहेत आरोप?
टायगर वूड्सवर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंमली पदार्थांच्या किंवा औषधांच्या प्रभावाखाली वाहन चालवणे (DUI), सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि कायदेशीर चाचणी देण्यास नकार देणे.
८ तास जेलमध्ये
फ्लोरिडाच्या कायद्यानुसार, अशा प्रकरणात अटक झाल्यानंतर किमान ८ तास जेलमध्ये राहावे लागते. त्यानुसार वूड्सला मार्टिन काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आले होते. सुदैवाने या अपघातात टायगर वूड्स किंवा ट्रक चालकाला कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही. वूड्सने गाडीच्या पॅसेंजर साईडच्या दरवाजातून बाहेर पडत स्वतःची सुटका केली.