विजयसोबत मोठ्या भागीदाऱ्या पहायला मिळतील
By Admin | Updated: June 14, 2015 01:52 IST2015-06-14T01:52:00+5:302015-06-14T01:52:00+5:30
सलामीचा सहकारी मुरली विजयसोबत भविष्यात मोठ्या भागीदारी बघायला मिळतील, असा विश्वास भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने व्यक्त केला.

विजयसोबत मोठ्या भागीदाऱ्या पहायला मिळतील
फतुल्लाह : सलामीचा सहकारी मुरली विजयसोबत भविष्यात मोठ्या भागीदारी बघायला मिळतील, असा विश्वास भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने व्यक्त केला. धवनने बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात १७३ धावांची खेळी केली. धवनने विजयसोबत (१५०) सलामीला २८३ धावांची भागीदारी केली. भारताने पहिला डाव ६ बाद ४६२ धावसंख्येवर घोषित केला. प्रत्युत्तरात खेळताना चौथ्या दिवसअखेर बांगलादेशने ३ बाद १११ धावांची मजल मारली.
चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना धवन म्हणाला, ‘‘हा माझा १४ वा कसोटी सामना आहे. गेल्या दौऱ्यात बरेच काही शिकायला मिळाले. भविष्यात माझ्यात व विजयमध्ये मोठ्या भागीदारी बघायला मिळतील.’’
धवनने त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. धवन म्हणाला, ‘‘विराट चांगला कर्णधार आहे. त्याचा सहकाऱ्यांवर विश्वास आहे. नेहमी विजयासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे शेवटी निकाल काय मिळतो, याचा विचार करीत नाही. त्याचे आमच्यासोबत मित्रत्वाचे नाते आहे.’’
पावसाच्या व्यत्ययामुळे या लढतीत २०० षटकांचा खेळ वाया गेला. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चांगली कामगिरी करताना बांगलादेशचा पहिला गडी झटपट बाद केला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली.
खान साहेब उस्मान अली स्टेडियममधील पाटा खेळपट्टीबाबत बोलताना धवन म्हणाला, ‘‘ही फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी असून, आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत. आम्ही तीन बळी घेतले आहेत. विश्वकप स्पर्धेसाठी असलेल्या खेळपट्ट्यांवर चेंडूला उसळी मिळत होती व स्विंगही मिळत होता. पण, येथे दोन-तीन षटकांनंतरच फटके खेळता येईल, याचा मला अंदाज आला. यानंतर सर्व काही अनुकूल घडले.’’
धवन म्हणाला, ‘‘या लढतीपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये माझी कामगिरी निराशाजनक होती. मी संघसंचालक रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफचा आभारी आहे. रवी शास्त्री यांचा संघावर विशेष प्रभाव आहे. ज्या वेळी मी आॅस्ट्रेलियात निराशाजनक कालखंडातून मार्गक्रमण करीत होतो त्या वेळी सर्व सपोर्ट स्टाफने माझी पाठराखण केली. त्यामुळे मला धावा फटकावण्यात यश आले.’’
धवन पुढे म्हणाला, ‘‘कसोटी क्रिकेटमध्ये माझी कामगिरी चांगली ठरत नव्हती; पण या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरल्यामुळे समाधानी आहे. (वृत्तसंस्था)