कसोटी पाण्यात!
By Admin | Updated: June 14, 2015 01:51 IST2015-06-14T01:51:58+5:302015-06-14T01:51:58+5:30
सलग चौथ्या दिवशी पावसाने कहर केल्यामुळे भारत-बांगलादेश कसोटी अनिर्र्णीत अवस्थेकडे वाटचाल करीत आहे. निकालाअभावी आयसीसी क्रमवारीत चौथ्या स्थानावर

कसोटी पाण्यात!
फातुल्ला : सलग चौथ्या दिवशी पावसाने कहर केल्यामुळे भारत-बांगलादेश कसोटी अनिर्र्णीत अवस्थेकडे वाटचाल करीत आहे. निकालाअभावी आयसीसी क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरण्याचे संकट भारतीय संघापुढे निर्माण झाले.
सामन्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी पुन्हा एकदा पाऊस खलनायक ठरला. संपूर्ण दिवसात ३०.१ षटकांचा खेळ शक्य झाला. भारताने कालच्या ६ बाद ४६२ वर पहिला डाव घोषित केल्यानंतर बांगलादेशाने खेळ थांबेपर्यंत ३ गड्यांच्या मोबदल्यात १११ धावा फळ्यावर लावल्या. सामन्याचा अखेरचा दिवस शिल्लक आहे. हवामानाचा अंदाज पाहता रविवारी खेळ होण्याची शक्यता क्षीण असल्याने निकाल लागण्याचीही चिन्हे नाहीत. हा सामना अनिर्णीत
राहिल्यास तिसऱ्या स्थानावर
असलेला भारतीय संघ चौथ्या स्थानावर घसरेल. द. आफ्रिका (१३०) आणि आॅस्ट्रेलियापाठोपाठ (१०८) भारत ९९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
भारत आणि न्यूझीलंडचे सारखे गुण आहेत; पण दशांशाच्या फरकाने न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. हा सामना अनिर्णीत राहिल्यानंतर भारताचे ९७ गुण होऊन हा संघ चौथ्या स्थानावर फेकला जाईल. अखेरच्या दोन दिवसांत बांगलादेशावर दडपण आणून सामना जिंकण्यासाठी विराट कोहलीने डाव घोषित केला. त्यादृष्टीने यजमान संघाचे ३ गडीदेखील बाद केले; पण भारताच्या आशेवर पावसाने पाणी फेरले. आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विन आणि दोन वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या हरभजनने बांगलादेशाच्या फलंदाजांपुढे आव्हान उभे केले. अंधुक प्रकाशामुळे उपाहाराच्या वेळेआधीच खेळ थांबविण्यात आला. सलामीचा इमरुल कायेस (नाबाद ५९) याने एकाकी झुंज देत भारतीय गोलंदाजांना तोंड दिले. त्याच्यासोबत अष्टपैलू शाकीब अल हसन खाते न उघडता नाबाद होता. कायेसने ९८ चेंडंूतील अर्धशतकी खेळीत १० चौकार मारले. आश्विनने तमीमला बाद करून पहिला धक्का दिला. तमीमने १९ धावांचे योगदान दिले. यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याने त्याला बाद केले. यानंतर मोमिनुल हक आणि इमरुल कायेस यांनी दुसऱ्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली.
भज्जीने ही जोडी फोडली. भज्जीने ५४ चेंडूंवर ४ चौकारांसह ३० धावा ठोकणारा मोमिनुल हक याला उमेश यादवकडे झेल देण्यास भाग पाडून ४१४वा कसोटी बळी मिळविला. दोन धावांची भर पडत नाही, तोच मुशफिकीर रहीम हा आश्विनच्या चेंडूवर स्लिपमध्ये रोहित शर्माकडे
झेल देऊन परतला. यानंतर
पावसाला सुरुवात झाल्याने खेळ होऊ शकला नाही.
आश्विनने गोलंदाजीचा प्रारंभ ईशांत शर्मा आणि आश्विनकडून करवून घेतला. त्याचा हा डाव यशस्वी ठरला. ईशांतने ४ षटकांत केवळ १३ धावा दिल्या, तर आश्विनने ३० धावांत २ गडी बाद केले. कायेसला १० धावांवर जीवदान मिळाले. शिखर धवनने उमेशच्या चेंडूवर त्याचा
झेल सोडला. पंचांनी चहापानानंतर खेळ होण्याची शक्यता वाटत नसल्याने दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. (वृत्तसंस्था)
धावफलक
भारत पहिला डाव : ६ बाद ४६२ वर घोषित. बांगलादेश पहिला डाव : तमीम इक्बाल यष्टिचीत गो. अश्विन १९, इमरुल कायेस खेळत आहे ५९, मोमिनुल हक झे. यादव गो. हरभजन ३०, मुशफिकूर रहीम झे. रोहित गो. अश्विन २, शाकीब अल हसन खेळत आहे. १, अवांतर : १, एकूण : ३०.१ षटकात ३ बाद १११ धावा. गडी बाद क्रम : १/२७, २/१०८, ३/११०. गोलंदाजी : ईशांत ४-०-१३-०, अश्विन ११.१-२-३०-२, उमेश ४-०-३४-०, अॅरोन ४-०-११-०, हरभजन ७-०-२३-१.