उसेन बोल्टचा विश्वविक्रम मोडणाऱ्या Srinivas Gowdaने मोदी सरकारच्या ऑफरला दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 21:07 IST2020-02-17T21:06:44+5:302020-02-17T21:07:24+5:30
सरकारच्या म्हणण्यानुसार श्रीनिवास आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटला.

उसेन बोल्टचा विश्वविक्रम मोडणाऱ्या Srinivas Gowdaने मोदी सरकारच्या ऑफरला दिला नकार
कंबाला या पारंपरिक स्पर्धेत धावताना कर्नाटकच्या श्रीनिवास गौडाने जमैकाच्या उसेन बोल्टचाही वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला होता. त्यानंतर मोदी सरकारने त्याच्यापुढे एक ऑफर ठेवली होती. पण श्रीनिवासने मोदी सरकारची ऑफर धुडकावून लावली आहे.
वेगाचा अनभिषिक्त सम्राट अशी बिरुदावली यापूर्वी जमैकाचा धावपटू उसेन बोल्टला दिला जायची. पण आता बोल्टपेक्षा जलद भारताचा एक धावपटू धावतो, असे पाहायला मिळाले आहे. तो धावपटू कर्नाटकमधला असून त्याचे नाव श्रीनिवासन गौडा आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील त्याची दखल घेतली असून तो देशाला ऑलिम्पिक पदक जिंकवून देऊ शकतो, अशी आशाही व्यक्त केली आहे.
हा धावपटू नेमका पाहायला मिळाला कुठे
कर्नाटकमध्ये कंबाला जॉकी ही पारंपरिस स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेमध्ये बैलांच्या जोडीबरोबर धावायचे असते. जो सर्वात कमी वेळात ठराविक अंतर पूर्ण करेल, त्याला विजेता म्हणून घोषित केले जाते. या स्पर्धेत १०० मी. एवढे अंतर श्रीनिवासनने ९.५५ सेकंदांमध्ये पूर्ण केले असून त्याने उसेन बोल्टचा विक्रमही मोडीत काढला आहे.
आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, " कर्नाटकच्या श्रीनिवासनला आम्ही ट्रायलसाठी बोलावणार आहे. 'साई'मधील प्रशिक्षक त्याची ट्रायल घेतील. अॅथलॅटीक्सबाबत भारतामध्ये फार कमी लोकांना जाण आहे. पम आम्ही भारतामधील प्रतिभा वाया जाऊ देणार नाही."
सरकारच्या म्हणण्यानुसार श्रीनिवास आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटला. यावेळी भारतीय क्रीडा प्राधिकरणाची अधिकारी आणि प्रशिक्षकही उपस्थित होते. पण यावेळी धावण्यास श्रीनिवासनने धावण्यास नकार दिला. कारण सध्याच्या घडीला तो दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे त्याने तुर्तास धावण्यास नकार दिला आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले होते.