South Asian Games: Indian women's final in kabaddi |  दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा :  कबड्डीत भारतीय महिला अंतिम फेरीत
 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा :  कबड्डीत भारतीय महिला अंतिम फेरीत

ठळक मुद्देपुरुषांचा सलग दुसरा साखळी विजय

काठमांडू-    नेपाळ येथे सुरू असलेल्या " १३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील" कबड्डीतभारतीय महिलांनी शेवटच्या सामन्यात यजमान  नेपाळला ४३-१९ अशी धुळ चारत साखळीत अपराजित रहात अग्रक्रम पटकाविला. आता ९ डिसेंबर रोजी याच दोन संघात अंतिम लढत होईल. भारताने सुरुवाती पासूनच चढाई-पकडीचा आक्रमक खेळ करीत पहिल्या डावात २१-०९ अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला होता. दुसऱ्या डावात देखील तिचं आक्रमकता कायम ठेवत २४गुणांच्या फरकाने मोठा विजय मिळविला. अंतिम सामन्याची ही रंगीत तालीम होती. पुष्पां कुमारी, निशा, साक्षी, दीपिका यांनी या विजयात उत्कृष्ट खेळ केला. महिलांच्या दुसऱ्या साखळी सामन्यात बांगला देशने श्रीलंकेचा कडवा प्रतिकार १७-१६ असा मोडून काढत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. श्रीलंकेला यास्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही. त्यांची गुणांची पाटी कोरीच राहिली.

  पुरुषांच्या सामन्यात श्रीलंकेने यजमान नेपाळचे आव्हान ३४-२२ असे परतवून लावत या स्पर्धेत सलग दुसऱ्या साखळी विजयाची नोंद केली. या अगोदरच्या सामन्यात त्यांनी पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघाला नमवित भारता पुढे आव्हान निर्माण केले आहे. आजच्या शेवटच्या सामन्यात भारतीय पुरुष संघाने आपला पारंपारिक  प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ४९-२२ अशी धूळ चारत सलग दुसऱ्या साखळी विजयाची नोंद केली. सुरुवातीला १४-०८अशी भारताकडे आघाडी होती. शेवटची ५ मिनिटे पुकारली तेव्हा ३५-२२ अशी आघाडी भारताकडे होती. या शेवटच्या ५मिनिटाच्या खेळात भारताने धुव्वादार खेळ करीत १४ गुणांची कमाई केली. या उलट पाक संघाने आपले अवसान गाळल्यामुळे त्यांना एकही गुण मिळविता आला नाही. या स्पर्धेत आता भारत आणि श्रीलंका हे दोन संघ २-२ साखळी विजय मिळवीत आग्रक्रमांकावर आहेत.

Web Title: South Asian Games: Indian women's final in kabaddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.