Saina Nehwal: "शरीर साथ देत नाहीये..." दुखापतीशी झुंजणाऱ्या सायना नेहवालचा अखेर बॅडमिंटनला गुडबाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 11:25 IST2026-01-20T11:23:07+5:302026-01-20T11:25:38+5:30
Saina Nehwal Retirement: भारताची शान आणि कोट्यवधी तरुणांची प्रेरणा, ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

Saina Nehwal: "शरीर साथ देत नाहीये..." दुखापतीशी झुंजणाऱ्या सायना नेहवालचा अखेर बॅडमिंटनला गुडबाय!
भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून देणारी बॅडमिंटन क्वीन सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली. " गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतींशी झुंजणाऱ्या सायनाने शरीर साथ देत नाही, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आणि कारकिर्दीला पूर्णविराम दिला. गेल्या दोन वर्षांपासून सायना गुडघ्याच्या जुनाट समस्येमुळे त्रस्त होती. तिने आपला शेवटचा सामना २०२३ च्या सिंगापूर ओपनमध्ये खेळला होता.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना सायनाने स्पष्ट सांगितले की, "माझ्या गुडघ्याची दुखापत गंभीर असून मला संधिवात झाला आहे. सर्वोत्तम खेळ करण्यासाठी तुम्हाला दिवसाला ८ ते ९ तास सराव करणे आवश्यक आहे. परंतु, माझा गुडघा अवघ्या एक-दोन तासांतच माझी साथ सोडत होता. सूजही येत होते. त्यामुळे अधिक सराव करणे, माझ्यासाठी अवघड झाले. जर तुमचे शरीर साथ देत नसेल, तर थांबणेच योग्य असते."
सायना नेहवालने २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला होता. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला गंभीर दुखापत झाली होती, मात्र जिद्दीच्या जोरावर तिने पुनरागमन केले आणि २०१७ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. त्यानंतर २०१८ मध्ये तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषवलेल्या सायनाने सांगितले की, तिने आपल्या पालकांना आणि प्रशिक्षकांना आपल्या शारीरिक स्थितीबद्दल स्पष्ट कल्पना दिली होती. निवृत्तीच्या औपचारिक घोषणेपेक्षा, स्पर्धांमधील तिची अनुपस्थितीच चाहत्यांना सर्व काही सांगून जाईल, असा विश्वास तिने व्यक्त केला. सायनाच्या या निर्णयामुळे भारतीय बॅडमिंटनमधील एका सुवर्ण पर्वाचा अंत झाला असून, तिच्या योगदानाबद्दल क्रीडा विश्वातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.