खेलो इंडिया २०२० : ‘आसाम सुरक्षित! कोणतीही चिंता नको’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 02:43 AM2019-12-30T02:43:47+5:302019-12-30T06:45:27+5:30

यजमानपदासाठी आसाम सरकार सज्ज

Play India 1: 'Assam Safe! No worries' | खेलो इंडिया २०२० : ‘आसाम सुरक्षित! कोणतीही चिंता नको’

खेलो इंडिया २०२० : ‘आसाम सुरक्षित! कोणतीही चिंता नको’

Next

- रोहित नाईक

गुवाहाटी : काही दिवसांपूर्वी सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध गुवाहाटीत तीव्र निदर्शने झाली होती. यादरम्यान शहरामध्ये कर्फ्यूही लावण्यात आला होता; मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असून स्पर्धेदरम्यान कोणतीही अडचण येणार नसल्याची ग्वाही खेलो इंडिया यूथ गेम्सचे सीईओ अविनाश जोशी यांनी ‘लोकमत’कडे दिली.

९ ते २२ जानेवारीदरम्यान गुवाहाटी येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष असून गतविजेता महाराष्ट्र या वेळी आपल्या सांघिक जेतेपदाचा बचाव करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, आसाममधील स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून येथे येणाऱ्या कोणत्याही नागरिकाला कोणताही त्रास होणार नसल्याचे आसाम सरकारने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जोशी म्हणाले, ‘नक्कीच काही दिवसांपूर्वी गुवाहाटीमध्ये तणावपूर्ण स्थिती होती, परंतु आता स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. खेळाडूंच्या वास्तव्याच्या ठिकाणी व स्पर्धा ठिकाणी कडक सुरक्षा असेल. याशिवाय खेळाडूंच्या प्रवास मार्गावर व वाहनांमध्येही सुरक्षा रक्षक तैनात असतील. त्यामुळे गुवाहाटी पूर्णपणे सुरक्षित राहील याची आम्ही काळजी घेतली आहे.’

गुवाहाटीला क्रीडा राजधानी बनविण्याचे ध्येय असल्याचे सांगताना मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांचे यजमानपद गुवाहाटीला मिळाल्याचा आनंद आहे. आसामसाठी ही मोठी संधी असून गुवाहाटी शहराला क्रीडा राजधानी बनविण्याचे आमचे ध्येय आहे. त्याचप्रमाणे, ‘यंदा खेलो इंडिया स्पर्धेत विविध खेळांसह संपूर्ण भारताचे सांस्कृतिक दर्शनही घडेल,’ असा विश्वासही सोनोवाल यांनी व्यक्त केला.

आसाममध्ये क्रीडा वातावरण तयार करण्यावर भर असल्याचे सांगताना सोनोवाल म्हणाले, ‘हिमा दास आसामची शान आहे. तिच्यापासून प्रेरणा घेत अनेक युवा खेळांकडे वळू लागले. यासाठी आम्ही राज्यात क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा निर्णय घेतला असून याअंतर्गत तिरंदाजी, फुटबॉल यांसारख्या विविध खेळांचे विशेष विद्यालयही उभारण्यात येईल. याशिवाय यंदाच्या स्पर्धेत खेळांसोबतच सांस्कृतिक दर्शनही घडविण्यात येईल.’

देशाच्या संस्कृतीचे घडणार दर्शन
स्पर्धेदरम्यान आसामसोबत प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे दर्शन होईल. यासाठी आयोजकांनी प्रत्येक राज्याच्या सांस्कृतिक विभागाशी संपर्क केला आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशाची संस्कृती एकाच ठिकाणी पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळेल. त्याचप्रमाणे काही खेळाडू सांस्कृतिक कला सादर करण्यास उत्सुक असल्यास त्यांनाही आपले कलागुण दाखविण्याची संधी मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तीन दिवसांचा हा सांस्कृतिक कार्यक्रम यंदाच्या स्पर्धेत अनोखे आकर्षण ठरेल.

Web Title: Play India 1: 'Assam Safe! No worries'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.