प्रो कबड्डीतील यशस्वीनी! अंकिता मातोंडकरने दाखवली महिलांना करिअरची नवी दिशा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 12:37 PM2022-12-01T12:37:51+5:302022-12-01T12:40:13+5:30

पुणेरी पलटन संघाच्या फिजिओ अंकिता मातोंडकर यांनी क्रीडा क्षेत्रात महिलांना करिअरची नवी दिशा दाखवली आहे. 

Physio Ankita Matondkar of Puneri Paltan team has shown a new career direction for women in the field of sports  | प्रो कबड्डीतील यशस्वीनी! अंकिता मातोंडकरने दाखवली महिलांना करिअरची नवी दिशा

प्रो कबड्डीतील यशस्वीनी! अंकिता मातोंडकरने दाखवली महिलांना करिअरची नवी दिशा

googlenewsNext

ओमकार संकपाळ 

मुंबई : आज महिला साडी, टिकली यात अडकून पडलेली नाही. करीअरच्या नवनवीन संधीच्या शोधात ती घराचा उंबरठा ओलांडत आहे आणि समाजासमोर एक स्वतःचा वेगळा आदर्श निर्माण करत आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सपोर्ट स्टाफमध्ये जेव्हा एकमेव महिला दिसली तेव्हा तिची फार चर्चा रंगली... आयपीएलमध्ये प्रथमच एखाद्या संघाच्या ताफ्यात महिला सपोर्ट स्टाफ दिसली. असाच प्रयोग प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटन संघाकडून झालेला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या या पुढाकाराचे कौतुकही होतेय.... मराठमोळी अंकिता मातोंडकर ही पुणेरी पलटनसोबत फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करतेय... हे करियर निवडताना आणि पुरुष कबड्डीपटूंसोबत काम करताना आलेल्या अनुभव तिने 'लोकमत' शी बोलताना सांगितला अन् तिच्या या प्रवासातून मुलींना करियरसाठी नवी दिशा नक्की मिळेल.

शालेय जीवनापासून क्रीडा क्षेत्राची आवड असल्याने या करिअरकडे वळली. मेडिकलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर स्पोर्ट्स फिजिओथेरपी विषय निवडला आणि त्यात मास्टर्स केले. खेळातील आवडीमुळे या क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. या प्रवासाची सुरुवात मुंबई मॅरेथॉन स्पर्धेतून झाली, त्यानंतर स्थानिक पातळीवर काम केले. टेनिसपटू ऋतुजा भोसले यांच्यासोबत २०२०मध्ये भरपूर ठिकाणी प्रवास केला. इजिप्तमध्ये जवळपास १ महिना काम पाहिले. प्रबोधनकार ठाकरे विलेपार्ले जिमनॅस्टिक्स इथे देखील फिजिओ म्हणून काम पाहिले, असे अंकिता यांनी सांगितले. 

प्रो कबड्डी फ्रँचायझी पुणेरी पलटन यांच्याकडून कामाची ऑफर आली, सुरुवातीला पुरुष कबड्डीपटूंसोबत काम करायला जमेल का, अशी शंका मनात आली. पण, सर्वांच्या सहकार्यामुळे सगळे काही सुरळीत झाले. कबड्डीमध्ये सगळं काही जलद अर्थात वेळेत होणे गरजेचे असते, त्यामुळे हे एक मोठे आव्हान होते. कारण खेळाडूंना पटकन मॅटवर घ्यायचे असते. कमी वेळात कोणत्या खेळाडूला मॅटवर पाठवायचे हे एक आव्हान असते असे, असे अंकिता यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, खेळाडूंना देखील सुरूवातीला एका महिलेशी संवाद साधताना अवघडल्यासारखे वाटायचे पण नंतर सगळं व्यवस्थित झाले. कॅम्पच्या आधीच खेळाडूंसोबत त्यांच्या आरोग्याविषयी चर्चा केली जाते. त्याच्यावर काम केले जाते, त्यांच्यामध्ये कोणती मजबूत बाजू आहे हे पाहिले जाते. सामन्याच्या तारखा आल्यानंतर त्यानुसार तयारी केली जाते. हा खेळ जोखिमेचा असल्यामुळे दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. राखीव खेळाडूंना देखील आरोग्याविषयी काळजी घ्यावी लागते.  

फिजिओथेरपिस्टमध्ये महिलांच्या संधीबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, महिलांना या क्षेत्रात खूप संधी आहे. या क्षेत्राबाबत एवढी जागरूकता नव्हती. मात्र आता फिजिओथेरपीची देखील जागरूकता वाढत आहे. कारण दिवसेंदिवस खेळाला प्राधान्य दिले जातेय. बाकीच्या मेडिकल स्टार्फ यांना देखील महत्त्व मिळत चालले आहे. प्रो कबड्डीमुळे अधिक चालना मिळाली आहे. पुरूष आणि महिला खेळाडूंची फिजिओ म्हणून जास्त फरक जाणवत नाही. काही गोष्टी नक्कीच वेगळ्या आहेत, मात्र एकदम अवघड नाही.

(अंकिता मातोंडकर, लीड स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट, सेंटर फॉर स्पोर्ट्स मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Physio Ankita Matondkar of Puneri Paltan team has shown a new career direction for women in the field of sports 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.