ऑलिम्पिक पदकाचे ध्येय व मोबाईल न वापरण्याचा निर्धार!; यशात काका पवारांचे सर्वाधिक योगदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 06:35 IST2020-01-12T02:39:16+5:302020-01-12T06:35:40+5:30
नाशिकचे उपकार विसरणार नाही !

ऑलिम्पिक पदकाचे ध्येय व मोबाईल न वापरण्याचा निर्धार!; यशात काका पवारांचे सर्वाधिक योगदान
धनंजय रिसोडकर
नाशिक : हर्षवर्धनचे रविवारी नाशकात आगमन होत असून, त्याचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. नाशिकच्या मातीचे उपकार कधीच विसरणार नाही, मदतीसाठी उभे राहिलेले माझे गुरू गोरखनाना बलकवडे यांच्यामुळेच मी महाराष्टÑ केसरीपर्यंत मजल मारू शकलो, असेही हर्षवर्धनने सांगितले.
कुस्तीची आवड आणि प्रारंभीचे प्रोत्साहन तुला कुणाकडून मिळाले?
सदगीर : आजोबा पैलवान होते. त्यांनीच सर्वप्रथम माझ्यात कुस्तीची आवड निर्माण केली. जत्रेतील कुस्त्या खेळायला लागलो. तेथून मग मला वडिलांनी त्यांचे एक पैलवान मित्र बाळू जाधव यांच्याकडे नेले. तिथे त्यांनी माझी तयारी बघून मला भगूरला बलकवडे व्यायामशाळेत जाण्याचा सल्ला दिला.
भगूरच्या व्यायामशाळेत दाखल झालास, त्यावेळी काही ध्येय ठरवले होतेस का?
सदगीर : त्यावेळी मला कुस्तीची अन् डावपेचांची माहिती नव्हती. त्यावेळी मोठे ध्येय काय असते, ते माहिती नव्हते. फक्त मोठा पैलवान बनायचं एवढाच विचार होता. २०१५ साली मला सैन्यदलातील नौकरी मिळाली होती. तेथील दिनक्रमात माझे कुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवले. त्यामुळे सहाच महिन्यांत मी सैन्यदलातील नोकरीचा राजीनामा दिला.
राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळायचे ठरविल्यावर कुस्ती प्रशिक्षणात काय बदल केले?
सदगीर : विशाल बलकवडे या मार्गदर्शकांनीदेखील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सामन्यांचे व्हिडिओ दाखवून डावपेचांची माहिती देण्यास प्रारंभ केला. त्यातून प्रतिस्पर्धी मल्लांचा कसा अभ्यास करायचा, त्यांची बलस्थाने, कच्चे दुवे कसे लक्षात घ्यायचे त्याचे तंत्र समजून घेतले.
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीसाठी तू नक्की काय डावपेच आखले होते?
सदगीर : मी अंतिम फेरीत पोहोचल्यावर प्रतिस्पर्धापेक्षा माझ्याकडे स्टॅमिना अधिक असल्याचे मला माहिती होते. त्यामुळे प्रारंभीच्या तीन मिनिटांत त्याची केवळ तयारी पहायची, त्याला गुण मिळू द्यायचा नाही असेच धोरण ठरवले होते. ग्रीको रोमन खेळणारा मल्ल अनेकदा पटात कमजोर असतो. त्यामुळेच अखेरच्या तीन मिनिटांत चपळाईने संधी मिळाली की एकेरी पट काढायचा असे मी ठरवले होते.
यशात काका पवारांचे सर्वाधिक योगदान आहे. दहा वर्षांहून अधिक काळ मी भगूरला प्राथमिक धडे गिरविले असून, पुण्यात काका पवारांकडे कुस्ती अधिक चांगली होईल, म्हणून नाना बलकवडे यांनी तीन वर्षांपूर्वी पुण्याला पाठविले. महाराष्ट्र केसरीनंतर आगामी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्यासाठी मोबाईलपासून दूर राहणार आहे. मी अनेक वर्षांपासून स्मार्टफोन वापरत नाही.