'पिस्तूल क्वीन' राही सरनोबत उपजिल्हाधिकारी झाली; पण ८ वर्षांपासून तिचा पगारच काढला नाही; कारण न पटण्याजोगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:44 IST2025-07-15T13:32:12+5:302025-07-15T13:44:16+5:30
प्रशासनाचा गजब कारभार; या कारणास्तव काढला नाही पगार

'पिस्तूल क्वीन' राही सरनोबत उपजिल्हाधिकारी झाली; पण ८ वर्षांपासून तिचा पगारच काढला नाही; कारण न पटण्याजोगे
कोल्हापूरची शान अन् देशाचा अभिमान असणारी आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबत हिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अनेक पदकं जिंकून विशेष छाप सोडली आहे. अचूक लक्ष भेदून आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षेधी कामगिरी केल्याबद्दल राही सरनोबत हिला २०१४ मध्ये उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्त करण्यात आली. सरकारी नोकरी मिळाली, पण मागील ८ वर्षांपासून तिचा पगारच काढलेला नाही. हा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रशासनाचा गजब कारभार; या कारणास्तव काढला नाही पगार
उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाल्यावर राही सरनोबत हिला पहिले तीन वर्षे पगार मिळाला. पण त्यानंतर ८ वर्षे राही सरनोबतचा पगार थकीत आहे. प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण न केल्यामुळे पगार काढण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे. राही सरनोबत सातत्याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे तिला सरकारी नोकरीतील आवश्यक प्रशिक्षणार्थी कालवाधी पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे प्रशासनानं दिलेले कारण हे न पडण्याजोगेच आहे. यासंदर्भात राहीसह तिच्या कुटुंबियांनी वारंवार प्रशासनाकडे दाद मागितली, पण म्हणावा तसा प्रतिसाद काही मिळाला नाही.
विधानसभेत मांडला मुद्दा, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडूनही सकारात्मक प्रतिसाद
जागतिकस्तरावर देशाचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूच्या वेतन थकीत असल्याचा मुद्दा आमदार अमित गोखले यांनी सोमवारी विधान परिषदेत मांडला आहे. मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला पगार काढण्यासोबत सेवेत नियमित करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले आहे. या मुद्यावर खुद्द राही सरनोबत हिने दोन महिन्यांपूर्वी उप मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. पहिल्यांदाच या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित दादांशी चर्चा केली, त्यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असून आता हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास राहीनं एका मुलाखतीमध्ये व्यक्त केला.