आता मुलाला कोणी टोमणे नाही मारणार - सेहवाग
By Admin | Updated: May 31, 2014 18:45 IST2014-05-31T12:10:59+5:302014-05-31T18:45:26+5:30
आयपीएल-७ मध्ये चेन्नई सुपरकिंग्जच्या विरोधात शानदार खेळी करणा-या वीरेंद्र सेहवागने हे शतक त्याच्या मुलाला समर्पित केले आहे.

आता मुलाला कोणी टोमणे नाही मारणार - सेहवाग
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ३१ - आयपीएल -७ मधील चेन्नई सुपरकिंग्जच्या विरोधात खेळताना शानदार खेळी करणा-या वीरेंद्र सेहवागने (१२२) हे शतक त्याच्या मुलाला समर्पित केले असून 'आता माझ्या मुलाला त्याचे मित्र टोमणे मारणार नाही' अशी प्रतिक्रियाही त्याने व्यक्त केली. मुलाला दिलेला शब्द पूर्ण केल्यामुळे त्याच्या चेहे-यावर एक वेगळचं समाधान होतं. शुक्रवारी झालेल्या थरारक सामन्यात सेहवागच्या ५८ चेंडूतील १२२ धावांच्या खेळीमुळे पंजाबने २२६ धावांचा हिमालय उभा केला. त्याला प्रत्युत्तर देताना चेन्नईनेही २०० धावांचा टप्पा पार तर केला, मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही.
पंजाबच्या विजयानंतर बोलताना सेहवागने ही खेळी त्याच्या मुलासाठी असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ' माझ्या पत्नीचा फोन आल्यानंतर माझं मुलाशीही बोलण व्हायचं. त्याने मला विचारलं, बाब तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही लौकर आऊट होता, तेव्हा माझे मित्र मला चिडवतात. मी त्याला म्हटलं, बेटा थोडं थांब, अजून बरेच सामने बाकी आहेत.' माझा शब्द मी पूर्ण केला, यावेळच्या खेळीनंतर आता माझ्या मुलाला कोणीही काही बोलणार नाही अशी मला आशा आहे, असे सेहवाग म्हणाला.
सेहवाग म्हणजे काय चीज आहे, याचे प्रत्यंत्तर वानखेडेवर आले. त्याने केलेल्या धुवाधार १२२ धावांच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकांत ६ बाद २२६ असा धावांचा हिमालय उभा केला. इंग्लंड दौर्यासाठी निवडलेल्या संघात समावेश न झाल्याची वीरूची खदखद वानखेडेवर बाहेर आली. चेन्नई सुपरकिंग्जच्या गोलंदाजीची पिसे काढत त्याने २१ चेंडूत अर्धशतक, तर ५० चेंडूंत शतक पूर्ण केले. सेहवागचे आयपीएलमधील हे दुसरे शतक आहे.