निकहत जरीनचा गोल्डन पंच, बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची सोनेरी हॅटट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 19:30 IST2023-03-26T19:29:59+5:302023-03-26T19:30:50+5:30
Women World Boxing Championship: भारताची स्टार महिला बॉक्सर निकहत जरीन हिने रविवारी इतिहास रचला. तिने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे.

निकहत जरीनचा गोल्डन पंच, बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची सोनेरी हॅटट्रिक
भारताची स्टार महिला बॉक्सर निकहत जरीन हिने रविवारी इतिहास रचला. तिने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. निकहत हिने या वजनी गटात व्हिएतनामच्या एनगुएन थि ताम हिला ५-० असं नमवत सुवर्णपदकावर नाव कोरलं. या स्पर्धेतील निकहतचं हे दुसरं विजेतेपद आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन विजेतेपदं पटकावणारी निकहत ही दुसरी भारतीय महिला बॅक्सर आहे. दरम्यान, यंदा या स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या तीन महिला बॉक्सरनी सुवर्णपदावर नव कोरलं आहे.
निकहत जरीन आणि एनगुएन थि ताम यांच्यामधील अंतिम लढतीतील पहिली फेरी रोमांचक झाली. त्यात रेफरींनी सर्वसहमतीने निकहतला पॉईंट दिले. व्हिएतनामी बॉक्सरने दुसऱ्या राऊंडमध्ये निकहतला पुन्हा कडवी टक्कर मिळाली. त्यानंतर प्रतिस्पर्धी बॉक्सरने हा राऊंड ३-२ अशा फरकाने जिंकला. अंतिम फेरीही अटीतटीची झाली. मात्र त्यात निकहतने बाजी मारत सामन्यावर कब्जा केला.
यंदा या स्पर्धेत निकहतच्या आधी नीतू घनघस आणि स्वीटी बूरा यांनी सुवर्णपदके जिंकली होती. त्यानंतर आता २६ वर्षीय निकहतने सुवर्णपदकावर कब्जा करत भारतासाठी सोनेरी हॅटट्रिक केली. गतवर्षीही निकहतने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. या स्पर्धेत मेरीकोम हिने तब्बल सहा सुवर्णपदके पटकावली होती. तर सरिता देवी, जेनी आरएल, लेखा केसी यांनी प्रत्येकी एकदा सुवर्णपदक पटकावले होते.