न्यूझीलंडची इंग्लंडवर मात
By Admin | Updated: June 14, 2015 01:52 IST2015-06-14T01:52:01+5:302015-06-14T01:52:01+5:30
रॉस टेलरने केलेले शानदार शतक (११९) व गोलंदाजांनी केलेल्या संयमित माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला १३ धावांनी पराभूत केले.

न्यूझीलंडची इंग्लंडवर मात
लंडन : रॉस टेलरने केलेले शानदार शतक (११९) व गोलंदाजांनी केलेल्या संयमित माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला १३ धावांनी पराभूत केले. या विजयामुळे पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने १-१ अशी बरोबरी साधली आहे. सामन्यादरम्यान आलेल्या पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमाचा आधार घेण्यात आला.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३९८ धावा केल्या; मात्र पावसामुळे इंग्लंडला ४६ षटकांत ३७९ धावांचे लक्ष्य देण्यात आले. इंग्लंडची सुरुवात धमाकेदार झाली. जॅसन रॉय व अॅलेक्स हेल्स
यांनी पहिल्या विकेटसाठी ८५
धावांची भागीदारी केली. नॅथन मॅक्युलमने रॉयला बाद करून ही जोडी फोडली. त्याच्यानंतर आलेल्या ज्यो रुटला मात्र सहाच धावा करता आल्या. त्याला मिशेल सेंटनरने बाद केले.
अलेक्स हेल्स मात्र एका बाजूने चांगली फलंदाजी करीत होता. त्याने ४९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांच्या साह्याने ५४ धावा केल्या; मात्र त्यालाही सेंटनरने बाद केले. सेंटनरने एकाच षटकात २ बळी घेऊन इंग्लंडला अडचणीत आणले; मात्र इयान मॉर्गनने जोस बटलरच्या साह्याने ९६ धावांची भागीदारी केली. मॉर्गनने ४७ चेंडूंत धुवाधार ८८ धावा केल्या; मात्र मॅक्लेनगनने त्याला बाद करून इंग्लंडच्या आशा संपुष्टात आणल्या. इंग्लंडला ९ बाद ३६५ धावाच करता आल्या.
तत्पूर्वी, रॉस टेलर नाबाद ११९ व केन विल्यम्सनच्या ९३ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने ५ बाद ३९८ धावा केल्या. इंग्लंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४०८ धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने त्यांना उत्तर देत आतापर्यंत दोन नंबरची सर्वोच्च धावसंख्या उभारली. २००८मध्ये न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध ४०२ धावा केल्या होत्या.(वृत्तसंस्था)