'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:14 IST2025-12-25T13:12:35+5:302025-12-25T13:14:38+5:30
या यादीत एकाही क्रिकेटरचा सामावेश नाही

'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार हार्दिक सिंग याची यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. दुसरीकडे, युवा विश्वचषक विजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, डेकॅथलिट तेजस्विन शंकर यांच्यासह एकूण २४ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी नावे सुचवण्यात आली आहेत. पुरस्कार निवड समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
प्रथमच योगासन खेळाडू आरती पाल हिची अर्जुन पुरस्कारासाठी
भारतीय हॉकी संघातील स्टार आणि मध्यरक्षक हार्दिक हा टोकियो ऑलिम्पिक २०२१ आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. यावर्षी आशिया चषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. माहितीनुसार, क्रीडा मंत्रालयाकडून औपचारिक मान्यता मिळाल्यानंतर पाच वर्षानी प्रथमच योगासन खेळाडू आरती पाल हिची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. आरती राष्ट्रीय व आशियाई चॅम्पियन असून, आशियाई स्पर्धेत योगासन प्रात्यक्षिक खेळ म्हणून समाविष्ट होणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या यादीत एकाही क्रिकेटरचा सामावेश नाही
निवड समितीत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष गगन नारंग, माजी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट व माजी हॉकीपटू एम. एम. सोमाया यांचाही समावेश आहे. दिव्या देशमुख ही विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. बुद्धिबळपटू विदित गुजराती आणि डेकॅथलिट तेजस्विन शंकर यांचीही शिफारस झाली आहे. तेजस्विनने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि यावर्षी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही दुसरे स्थान मिळवले होते. दोन वेळा विश्व अजिंक्यपद कांस्य विजेती रायफल नेमबाज मेहुली घोष, जिम्नॅस्ट प्रणती नायक, तसेच भारताची क्रमांक एक महिला बॅडमिंटन जोडी त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद यांचीही नावे या शिफारशीत आहेत. विशेष म्हणजे, या यादीत कोणत्याही क्रिकेटपटूचा समावेश नाही.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार: हार्दिक सिंग (हॉकी)
अर्जुन पुरस्कार : तेजस्विन शंकर, प्रियांका (दोघेही अॅथलेटिक्स), नरेंद्र (मुष्टियुद्ध), विदित गुजराती, दिव्या देशमुख (दोघेही बुद्धिबळ), धनुष श्रीकांत (मूकबधिर नेमबाजी), प्रणती नायक (जिम्नॅस्टिक्स), राजकुमार पाल (हॉकी), सुरजीत (कबड्डी), निर्मला भाटी (खो-खो), रुद्रांक्ष खंडेलवाल (पॅरा नेमबाजी), एकता भयान (पॅरा अॅथलेटिक्स), पद्मनाभ सिंग (पोलो), अरविंद सिंग (नौकायन), अखिल श्योराण (नेमबाजी), मेहुली घोष (नेमबाजी), सुतीर्था मुखर्जी (टेबल टेनिस), सोनम मलिक (कुस्ती), आरती पाल (योगासन), त्रिसा जॉली (बॅडमिंटन), गायत्री गोपीचंद (बॅडमिंटन), लालरेम्सियामी (हॉकी), मोहम्मद अफजल (अॅथलेटिक्स), पूजा (कबड्डी).