मुंबईची सामन्यावर पकड

By Admin | Updated: February 19, 2015 02:22 IST2015-02-19T02:22:24+5:302015-02-19T02:22:24+5:30

मुंबईने दुसऱ्या डावात ७ बाद ३७६ अशी मजल मारून रणजी करंडकर स्पर्धेतील सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर ३६६ धावांची आघाडी घेत दिल्लीला बॅकफूटवर नेले.

Mumbai grip on the match | मुंबईची सामन्यावर पकड

मुंबईची सामन्यावर पकड

कटक : यंदाच्या मोसमात सपशेल अपयशी ठरलेला सलामीवीर अखिल हेरवाडकर (१६१) मोक्याच्या वेळी फॉर्ममध्ये आला. त्याने झळकावलेल्या शानदार दीड शतकाच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या डावात ७ बाद ३७६ अशी मजल मारून रणजी करंडकर स्पर्धेतील सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर ३६६ धावांची आघाडी घेत दिल्लीला बॅकफूटवर नेले.
कटक येथे सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या डावातील चुका या वेळी मुंबईकरांनी टाळल्या. यामुळे सावध परंतु जबाबदारीपूर्वक खेळताना मुंबईकरांनी निर्णायक विजयाच्या दिशेने कूच केली़ कर्णधार आदित्य तरे (२३) लवकर बाद झाल्यानंतर हेरवाडकर आणि श्रेयश अय्यर (८२) यांनी तिसऱ्या विकेटसाठी जबरदस्त १७७ धावांची भागीदारी करीत मुंबईला सावरले.
अय्यर बाद झाल्यानंतर हेरवाडकरने सूर्यकुमार यादवसोबत (३१) महत्त्वपूर्ण ७१ धावांची भागीदारी केली. मात्र नेमका याचवेळी मनन शर्माने अचूक मारा करताना हेरवाडकर, निखिल पाटील (११) आणि यादव (३१) यांना ठरावीक अंतराने बाद करीत मुंबईला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यामुळे ३ बाद २८९ अशा सुस्थितीत असलेल्या मुंबईची ५ बाद ३१० अशी अवस्था झाली.
या वेळी खेळपट्टीवर असलेल्या सिद्धेश लाडने पुन्हा एकदा झुंजार खेळाचे प्रदर्शन केले. मात्र दुसऱ्या बाजूने अभिषेक नायर (१०) आणि विल्कीन मोटा (१५) यांना फार वेळ तग धरता न आल्याने तिसऱ्या दिवसअखेर मुंबईला ७ बाद ३७६ अशी मजल मारता आली. सध्या मुंबई मजबूत स्थितीत आहे.
चौथ्या दिवशी आक्रमक फलंदाजी करून दिल्लीला किमान ४०० हून अधिक धावांचे लक्ष देण्याचा मुंबईकरांचा प्रयत्न असेल. त्यामुळे लाडच्या खेळीवर सर्वांचेच लक्ष असेल.
दिल्लीकडून मनन शर्माने यशस्वी मारा करताना ८९ धावांत ४ बळी मिळवले. तर सुमित नरवाल, परविंदर अवाना आणि प्रदीप सांगवान यांना प्रत्येकी एक बळी मिळवण्यात यश आले. (वृत्तसंस्था)

मुंबई (पहिला डाव): सर्व बाद १५६ धावा , दिल्ली (पहिला डाव): सर्व बाद १६६ धावा, मुंबई (दुसरा डाव): हेरवाडकर झे. यादव गो. मनन १६१, तरे झे. यादव गो. सांगवान २३, अय्यर झे. मन्हास गो. अवाना ८२, यादव झे. यादव गो. मनन ३१, पाटील झे. यादव गो. मनन ११, लाड खेळत आहे ४१, नायर झे. सेहवाग गो. नरवाल १०, मोटा झे. गंभीर गो, मनन १५. अवांतर - २. एकूण : ११९.४ षटकांत ७ बाद २७६ धावा. गोलंदाजी : नरवाल २३-६-६३-१; अवाना २३-४-८६-१; सांगवान १७-२-६५-१; भाटिया १०-४-२७-०; मनन २९.४-६-८९-४; शिवम १७-५-४४-०.

हरियाणा : रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशचा तब्बल ७५ धावांनी पराभव करीत सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या डावात केदार जाधवने (८१) केलेली आक्रमक पाऊणशतकी खेळी व अनुपम संकलेचाच्या (१९ धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने हा विजय मिळविला.
हरयाणा येथील लाहलीच्या चौधरी बन्सीलाल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. पहिल्या डावापासून सामन्यावर गोलंदाजांचेच वर्चस्व राहिले. पहिल्या डावात आंध्र प्रदेशने महाराष्ट्राला ९१ धावांत गुंडाळले. त्यानंतर महाराष्ट्राने आंध्र प्रदेशला १३८ धावांवर रोखण्याची किमया केली. मात्र महाराष्ट्र ४७ धावा पिछाडीवर होता. दुसऱ्या डावात महाराष्ट्राने ६८.३ षटकांत सर्व गडी गमावून २२३ धावा करून आंध्र प्रदेशसमोर विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य ठेवले. आंध्र प्रदेशचा संघ १७७ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना १०१ धावांतच गारद झाला. (वृत्तसंस्था)

धावफलक : महाराष्ट्र पहिला डाव : सर्वबाद ९१ धावा ; आंध्रप्रदेश पहिला डाव : सर्वबाद १३८ धावा. महाराष्ट्र दुसरा डाव : सर्वबाद २२३ धावा ( हर्षद खडीवाले ४७, केदार जाधव ८१, शिवकुमार ६/७९, सी. व्ही. स्टीफन ३/५४) आंध्रप्रदेश दुसरा डाव : सर्वबाद १०१ धावा ( अनुपम संकलेचा ४/१९, फल्ला २/३३, मुथुस्वामी २/२६, श्रीकांत २/१७ )

Web Title: Mumbai grip on the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.