महाराष्ट्र केसरी : बाला रफिक जिंकला आणि गणपतराव आंदळकर यांचा विजय असो.., असा मैदानात नाद घुमला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 19:34 IST2018-12-23T19:34:00+5:302018-12-23T19:34:43+5:30
यावेळी मैदानात गणपतराव आंदळकर यांचा विजय असो.., असा नाद घुमला.

महाराष्ट्र केसरी : बाला रफिक जिंकला आणि गणपतराव आंदळकर यांचा विजय असो.., असा मैदानात नाद घुमला
जालना : बाला रफिक शेखने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गतविजेत्या अभिजित कटकेला पराभूत केले. या विजयानंतर जेव्हा बाला रफिकच्या वडिलांना प्रतिक्रीया विचारली तेव्हा, त्यांनी आपली भावना, गणपतराव आंदळकर यांचा विजय असो.., अशी व्यक्त केली. गणपतराव आंदळकरांचा विजय असो, असा जयघोष करताना महाराष्ट्र केसरी पिता ढसढसा रडल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं. हिंद केसरी गणपतरावांची आठवण सांगताना निशब्द झालेला बाप डोळ्यांच्या आनंदाश्रूतून व्यक्त होत होता.
बाला रफिक शेखच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. दोन वेळचा खुराकही त्याला व्यवस्थित मिळत नव्हता. पण घरातच कुस्ती होती आणि तीच परंपरा बाला रफिक शेखने कायम ठेवण्याचे ठरवले. त्याने कधीही प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ केला नाही. बुलाढाण्यामध्ये बाला रफिक शेखचे नाव गाजायला सुरुवात झाली.
कोल्हापूरमध्ये आंदळकर यांच्याकडे बाला रफिक कुस्ती शिकायला गेला होता. आंदळकरांनी यावेळी बाला रफिक कुस्तीचे संस्कार केले. बाला रफिक हा आंदळकर यांचा शेवटचा शिष्य होता. याच त्यांच्या शेवटच्या शिष्याने महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला. त्यामुळेच यावेळी मैदानात गणपतराव आंदळकर यांचा विजय असो.., असा नाद घुमला.