कोल्हापूरच्या पोरी भारी, भारतीय संघातही दमदार कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:23 IST2025-11-04T18:22:36+5:302025-11-04T18:23:26+5:30
क्रिकेटमध्ये मुलींची संख्या वाढली

कोल्हापूरच्या पोरी भारी, भारतीय संघातही दमदार कामगिरी
कोल्हापूर : महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळविला. कोल्हापूरच्या क्रिकेट विश्वात विशेषत: महिलांनी या विजयाचे जल्लोषी स्वागत केले. क्रिकेट म्हणजे केवळ मुलांचा खेळ असा समज असताना क्रीडानगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरच्या पोरीही क्रिकेटमध्ये भारी आहेत. जिल्हा संघात मुलींचा टक्का वाढला आहे.
महाराष्ट्राच्या महिला संघातून कोल्हापूरच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी बजाविली आहे. त्यात कोल्हापूरच्या आदिती गायकवाड, संजना वाघमोडे, सौम्यलता बिराजदार, ज्ञानेश्वरी पाटील आणि इचलकरंजीच्या संकेता देशपांडे या खेळाडूंचा समावेश आहे.
माजी क्रिकेट खेळाडू चंदाराणी कांबळे
कोल्हापूरच्या चंदाराणी कांबळे या एक माजी क्रिकेट खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक आहेत. त्यांनी १९ वर्षे महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत थाळीफेक, गोळाफेक आणि भालाफेक या खेळांमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली. त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू, प्रशिक्षक (फिटनेस), व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. त्यांनी सुमारे २० वर्षे महाराष्ट्र महिला क्रिकेटमध्ये सक्रिय भूमिका बजावली.
महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधार अनुजा पाटील
स्थानिक स्पर्धांत बॉलगर्ल म्हणून काम करणाऱ्या कोल्हापूरच्या अनुजा पाटीलने भारतीय महिलांच्या क्रिकेट संघात स्थान पटकावले. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भरीव योगदान दिले. अनुजा जिल्हा क्रिकेट असोसिएशनची खेळाडू आहे. ती सध्या महाराष्ट्र महिला संघाचे कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. बीसीसीआयने आंतर विभागीय स्पर्धेसाठी विभागीय संघांत वेस्ट झोन संघाच्या कर्णधारपदीही तिची निवड झाली. ती भारतीय टी २०, एशिया कप, चॅलेजंर ट्राॅफी स्पर्धेसाठी भारतीय संघातून खेळली. महाराष्ट्र १९ वर्षांखालील संघात सलग ४ वर्षे आणि त्यातील २ वर्षे कर्णधार पद भूषविले. महाराष्ट्र खुला गट महिला संघासह भारतीय संघात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली होती.
महाराष्ट्र संघाची कर्णधार शिवाली शिंदे
शिवाली शिंदेंची बीसीसीआय मार्फत घेतल्या जाणा-या टी २० स्पर्धेच्या महाराष्ट्र महिला सिनियर टी २० संघात आहे. तिची बंगळुरू येथील १९ वर्षाखालील नॅशनल क्रिकेट ॲकॅडमीत निवड झाली होती. सलग वर्षे १९ वर्षाखालील महाराष्ट्र महिला संघातून खेळली. २०११-१२ मध्ये १९ वर्षाखालील गटात महाराष्ट्र संघाची कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली. ऑल इंडिया इंटर झोनल महिला स्पर्धेसाठी खुल्या पश्चिम विभागीय (भारतीय) महिला क्रिकेट संघात उपकर्णधारपद भूषविले. भारतीय महिला टी-२० चॅलेंजर करंडक क्रिकेट स्पर्धेतही खेळली.
क्रिकेटमध्ये मुलींची संख्या वाढली आहे. जिल्हास्तरावर सर्व प्रकारच्या सुविधा खेळाडूंना उपलब्ध होत आहेत. सराव, फिटनेस, आहार, दर्जेदार प्रशिक्षक मिळत आहेत. त्यामुळेच राज्यासह विभागीय संघात निवड होत आहे. त्यातून भारतीय संघ निवडला जातो. - स्नेहा जामसांडेकर, समिती सदस्य, महाराष्ट्र निवड समिती