महाराष्ट्राची पहिल्याच दिवशी सुवर्ण लयलूट, ९ सुवर्णपदकांसह पटकावले अव्वल स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 09:24 AM2022-06-06T09:24:43+5:302022-06-06T09:25:19+5:30

Khelo India Youth Games 2022 : महाराष्ट्राने कुस्तीतही चमक दाखवताना एकूण तीन पदके पटकावली. मात्र यामध्ये एकही सुवर्ण पदक नाही.

Khelo India Youth Games 2022 : Maharashtra won the first place with 9 gold medals on the first day | महाराष्ट्राची पहिल्याच दिवशी सुवर्ण लयलूट, ९ सुवर्णपदकांसह पटकावले अव्वल स्थान

महाराष्ट्राची पहिल्याच दिवशी सुवर्ण लयलूट, ९ सुवर्णपदकांसह पटकावले अव्वल स्थान

Next

पंचकुला (हरयाणा) : गतविजेत्या महाराष्ट्र संघाने खेलो इंडिया युवा स्पर्धेत पहिल्याच दिवशी आपला जलवा दाखवला. तब्बल ९ सुवर्णपदकांची लयलूट करत बलाढ्य महाराष्ट्राने पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवले. रविवारी महाराष्ट्राला यजमान हरयाणाने चांगली टक्कर दिली आणि दिवसअखेर त्यांनी ६ सुवर्ण पदकांसह दुसरे स्थान मिळवले. मणिपूर ४ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.

भारोत्तोलनामध्ये महाराष्ट्राने जबरदस्त वर्चस्व राखताना ४ पैकी ३ सुवर्ण पदकांवर कब्जा केला. तसेच योगामध्ये ३, तर सायकलिंगमध्ये एक सुवर्ण पटकावले. हरयाणाने कुस्तीमध्ये अपेक्षित दबदबा राखताना ५ सुवर्ण पटकावले, तर सायकलिंगमध्ये एक सुवर्ण जिंकले. मणिपूरने थांग-ता क्रीडाप्रकारात ४ सुवर्ण पदकांची कमाई केली.

महाराष्ट्राच्या काजल सरगरने भारोत्तोलनामध्ये ४० किलो वजनी गटात बाजी मारत स्पर्धेतील पहिले सुवर्ण जिंकले. तिने स्नॅचमध्ये ५०, तर क्लीन व जर्कमध्ये ६३, असे एकूण ११३ किलो वजन उचलत सुवर्ण पटकावले. ४५ किलो गटात महाराष्ट्राच्या हर्षदा गरुडने संघाला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. तिने दुसऱ्या प्रयत्नात ८३ किलो वजन उचलत उत्तर प्रदेशच्या अंजली पटेलला मागे टाकले.

५५ किलो वजनी गटामध्ये मुकुंद अहेरने सुवर्ण बाजी मारताना अरुणाचल प्रदेशच्या छेरा तनिया आणि छत्तीसगडच्या राजा भारती यांचे आव्हान मोडले. सायकलिंगमध्ये ५०० मीटर टाईम ट्रायल गटात महाराष्ट्राच्या सज्ञा कोकाटेने सर्वोत्तम वेळ नोंदवताना सुवर्ण पदक जिंकले. सांघिक कामगिरीमध्ये महाराष्ट्राला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. योगासनामध्ये महाराष्ट्राच्या सुमित बांदलने पारंपरिक एकेरी गटात सुवर्ण जिंकले. 

दुहेरी अर्टिस्टिक गटात आर्यन खरात-निबोध पाटील यांनी महाराष्ट्राला सुवर्ण मिळवून दिले. तसेच, रिदमिक दुहेरी गटात ननक अभंग-अंश मयेकर यांनी सुवर्ण जिंकले आणि महाराष्ट्राने योगामध्ये सुवर्ण हॅटट्रिक नोंदवली. मुलींच्या पारंपरिक एकेरीमध्ये महाराष्ट्राच्या तन्वी रेडिजला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

कुस्तीतही पदके, पण...
महाराष्ट्राने कुस्तीतही चमक दाखवताना एकूण तीन पदके पटकावली. मात्र यामध्ये एकही सुवर्ण पदक नाही. ४६ किलो गटात कोल्हापूरच्या गौरी पाटील आणि ५७ किलो गटात अहमदनगरच्या धनश्री फंड यांनी कांस्य पदके पटकावली. ५७ किलो गटात प्रगती गायकवाडला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. हरयाणाच्या ज्योतीविरुद्ध तिला पराभवाचा सामना करावा लागला. मुलांमध्ये गौरव हजारे, ओंकार शिंदे, समृध्दी घोरपडे, साक्षी पाटील यांनीही लक्ष वेधले, परंतु त्यांना पदक मिळवता आले नाही.
 

Web Title: Khelo India Youth Games 2022 : Maharashtra won the first place with 9 gold medals on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.