आंतरराष्ट्रीय पातळीवर मी अद्याप नवखा खेळाडू
By Admin | Updated: June 16, 2015 02:05 IST2015-06-16T02:05:40+5:302015-06-16T02:05:40+5:30
आंतरराष्ट्रीय पातळीवर मी अद्याप नवखा खेळाडू असल्याचे मत वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याने व्यक्त केले. आयपीएल तसेच कर्णधार महेंद्रसिंह धोनी

आंतरराष्ट्रीय पातळीवर मी अद्याप नवखा खेळाडू
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर मी अद्याप नवखा खेळाडू असल्याचे मत वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याने व्यक्त केले. आयपीएल तसेच कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने दिलेल्या संधीच्या बळावर मी आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होऊ शकलो, असेही मोहित म्हणाला.
आॅगस्ट २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून मोहितने २० वन-डे आणि चार टी-२० सामने खेळले. अंतिम ११ जणांत त्याला नियमित स्थान मिळू शकले नव्हते; पण तो संघाचा नियमित सदस्य मात्र राहिला. संघात आपली उपयुक्तता वेगवेगळी असल्याचे फरिदाबादच्या या खेळाडूला वाटते. तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशाकडे रवाना होण्याआधी मोहित म्हणाला, ‘‘खरे तर मी अद्यापही स्वत:ला नवखा मानतो. पदार्पण केल्यापासून मी गोलंदाजी आणि फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. चांगल्या कामगिरीच्या बळावरच भारतीय संघात स्थान मिळते, हे चांगले लक्षात असल्याने मी हे स्थान टिकविण्यासाठी कामगिरीत सातत्य राखत आहे.’’ मोहित पुढील महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यासाठी स्वत:ला सिद्ध करीत आहे. २०१३मध्ये याच दौऱ्यात त्याने पहिल्यांदा संघात स्थान मिळविले होते. मोहित हा उमेश यादव किंवा वरुण अॅरोनसारखा वेगवान नसला, तरी योग्य लय आणि दिशा यांचा समन्वय साधून तो गोलंदाजी करीत असतो.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणारा मोहित म्हणाला, ‘‘मी वेगवान मारा करीत नसेन; पण चांगला मारा करू शकतो, याची खात्री आहे. मी १३५ किंवा १४० कि.मी. ताशी वेगाने मारा करतो. वेगवान चेंडू टाकण्याऐवजी योग्य टप्प्यावर चेंडू टाकले, की गोलंदाज ‘बिट’ होतो.’’ कसोटी क्रिकेट पदार्पणाच्या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल विचारताच तो म्हणाला, ‘‘पाच दिवसांचे सामने खेळण्याइतपत फिटनेस आवश्यक असल्यामुळे
सध्या फिटनेसवर अधिक लक्ष देत आहे.’’ (वृत्तसंस्था)