Paralympic: भारताची पदकांची चमकदार कमाई सुरुच; उंच उडीत रौप्य, नेमबाजीतही कांस्य पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 09:14 AM2021-09-01T09:14:25+5:302021-09-01T09:14:31+5:30

रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावलेल्या मरियप्पनने १.८६ मीटरची उडी घेत रौप्य निश्चित केले.

India's lucrative medal tally continues; Silver in high jump, bronze medal in shooting pdc | Paralympic: भारताची पदकांची चमकदार कमाई सुरुच; उंच उडीत रौप्य, नेमबाजीतही कांस्य पदक

Paralympic: भारताची पदकांची चमकदार कमाई सुरुच; उंच उडीत रौप्य, नेमबाजीतही कांस्य पदक

Next

टोकियो : पॅरालिम्पिक स्पर्धेत सोमवारी दोन सुवर्ण पदकांसह एकूण ५ पदकांची कमाई केल्यानंतर मंगळवारीही भारताच्या खात्यात आणखी तीन पदकांची भर पडली. उंच उडीत मरियप्पन थांगवेलू आणि शरद कुमार यांनी टी-४२ गटात अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक जिंकले. नेमबाजीत सिंहराज अडाना याने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदकावर नाव कोरले. यासह स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने एकूण १० पदकांची कमाई केली आहे.

रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावलेल्या मरियप्पनने १.८६ मीटरची उडी घेत रौप्य निश्चित केले. अमेरिकेच्या सॅम ग्रेवने १.८८ मीटरची झेप घेत सुवर्ण जिंकले. याच स्पर्धेत शरदने १.८३ मीटरची झेप घेत कांस्य पदकावर नाव कोरले. तसेच रिओमध्ये कांस्य जिंकलेल्या वरुण सिंग भाटी याला सातव्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याने १.७७ मीटरची झेप घेतली. भारताने आतापर्यंत यंदाच्या स्पर्धेत २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १० पदके जिंकली आहेत.

अडानाने घेतला कांस्य पदकाचा वेध!

नेमबाजीमध्ये सिंहराज अडाना याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल एसएफ-१ गटात कांस्य पदकाची कमाई केली. यासह अडानाने नेमबाजीत भारताला दुसरे पदक मिळवून दिले.

राकेश कुमार उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

भारताचा राकेश कुमार तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक कम्पाउंड उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. चीनच्या अल झिनलियांगविरुद्धच्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत राकेशचा १४३-१४५ असा पराभव झाला. याआधी राकेशने स्लोवाकियाच्या मारियान मारेसाक याचा १४०-१३७ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. तिरंदाजीत भारताची मदार आता हरविंदर सिंग आणि विवेक चिकारा यांच्यावर आहे.

कौतुकाची थाप!

उत्कृष्ट कामगिरीपर्यंतचा प्रवास करताना केलेला दृढनिश्चयाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे सिंहराज अडाना याचे पॅरालिम्पिक कांस्य पदक आहे. या शानदार यशासाठी अडानाचे अभिनंदन. देशाला तुझ्या कामगिरीचा गर्व आहे. भविष्यात तू आणखी गौरवास्पद कामगिरी कर.
    - रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

सिंहराज अडानाची अद्वितीय कामगिरी. भारताच्या गुणवान नेमबाजाने प्रतिष्ठित कांस्य पदक जिंकले. अडानाने कठोर मेहनत घेत उल्लेखनीय यश मिळवले. त्याचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

महिला टे. टे. संघाचे आव्हान संपले :

भारताच्या महिला टेबल टेनिस संघाचे क्लास ४-५ गटातील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. चीनविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारतीयांचा ०-२ असा पराभव झाला. रौप्य विजेत्या भाविना पटेलचाही समावेश होता. स्पर्धेत तिला तिसऱ्यांदा चीनच्या यिंग झोऊविरुद्ध पराभव पत्करावा लागला. यिंगविरुद्धच भाविनाचा अंतिम फेरीत पराभव झालेला. दुहेरीतही भाविना-सोनल पटेल यांचा यिंग आणि झांग बियानविरुद्ध पराभव झाल्याने भारताला स्पर्धेबाहेर जावे लागले.

 

 

Web Title: India's lucrative medal tally continues; Silver in high jump, bronze medal in shooting pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.