अनिर्णित कसोटीत भारताचे वर्चस्व

By Admin | Updated: June 15, 2015 01:07 IST2015-06-15T01:07:36+5:302015-06-15T01:07:36+5:30

आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनचे पाच बळी व हरभजनसिंगचा अचूक मारा याच्या जोरावर भारताने एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात बांगलादेशला फॉलोआॅन

India's domination in the drawn Test | अनिर्णित कसोटीत भारताचे वर्चस्व

अनिर्णित कसोटीत भारताचे वर्चस्व

फतुल्ला : आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनचे पाच बळी व हरभजनसिंगचा अचूक मारा याच्या जोरावर भारताने एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात बांगलादेशला फॉलोआॅन स्वीकारण्यास बाध्य केले, पण पाचव्या दिवशीही पावसाच्या लपंडावामुळे सामना अखेर अनिर्णित संपला. या लढतीत २५० पेक्षा अधिक षटकांचा खेळ पावसामुळे वाया गेला. या कसोटीत पूर्ण तीन दिवसांचा खेळही शक्य न झाल्यामुळे पाहुण्या संघाला अनुकूल निकाल मिळविता आला नाही.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने खेळाच्या सर्वच विभागांत वर्चस्व गाजवले. त्यामुळे गुरुवारपासून प्रारंभ होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेपूर्वी भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावण्यात मदत मिळेल.
भारताने पहिला डाव ६ बाद ४६२ धावासंख्येवर घोषित केला. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेशने पाचव्या व अखेरच्या दिवशी ३ बाद १११ धावसंख्येवरून प्रारंभ केला. पहिल्या सत्रात पावसामुळे खेळ शक्य झाला नसला, तरी बांगलादेशचा पहिला डाव ६५.५ षटकांत २५६ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे त्यांच्यावर फॉलोआॅन स्वीकारण्याची नामुष्की ओढवली. भारतातर्फे आश्विनने २५ षटकांत ८७ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले, तर हरभजनने १७.५ षटकांत ६४ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना माघारी परतवले. हरभजनने आज पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमला पिछाडीवर सोडताना कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नववा सर्वांत यशस्वी गोलंदाज होण्याचा मान मिळवला.
फॉलोआॅननंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात १५ षटकांत बिनबाद २३ धावा केल्या असता, उभय कर्णधारांनी सामना अनिर्णित संपल्याचे मान्य केले. त्या वेळी तमीम इक्बाल १६ व इमरुल कायेस ७ धावा काढून नाबाद होते.
बांगलादेशतर्फे पहिल्या डावात इमरुल कायेसने सर्वाधिक ७२ धावा केल्या, पण पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या लिट्टन दासने सर्वांना प्रभावित केले. लिट्टन दासने ४५ चेंडूंमध्ये ४५ धावांची आक्रमक खेळी केली. लिट्टनला आश्विनने तंबूचा मार्ग दाखवला. त्याने ८ चौकार व १ षटकार ठोकला. सौम्य सरकारने (३७) आक्रमक फलंदाजी केली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही.
आजच्या दोन सत्रांत आश्विनने वर्चस्व गाजवले. आश्विनने सर्वप्रथम साकिब अल-हसनला (९) बाद केले. त्यानंतर सरकारने कायेसच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. हरभजनने कायेसला बाद करीत या सामन्यात वैयिक्तक दुसरा बळी घेतला. कायेस हरभजनचा कारकिर्दीतील ४१५ वा बळी ठरला. हरभजन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वांत यशस्वी गोलंदाजांमध्ये नवव्या स्थानी पोहोचला. त्याने आज अक्रमचा (१०२ सामने, ४१४ बळी) विक्रम मोडला. त्यानंतरच्या षटकात वरुण अ‍ॅरोनने सरकारचा त्रिफळा उडवत सामन्यातील पहिला बळी घेतला. आश्विनने शुवागता होम (९) याला माघारी परतवल्यामुळे बांगलादेशची ७ बाद २१९ अशी अवस्था झाली. चहापानानंतर लिट्टन बाद झाला. त्यानंतर हरभजनने मोहम्मद शाहिदला तंबूचा मार्ग दाखवला, तर जुबेर हुसेन धावबाद झाल्यामुळे बांगलादेशचा डाव संपुष्टात आला. (वृत्तसंस्था)

Web Title: India's domination in the drawn Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.