Indian shooters continue to excel; Two gold medals won on Friday | भारतीय नेमबाजांची शानदार कामगिरी कायम; शुक्रवारी पटकावली दोन सुवर्ण पदके

भारतीय नेमबाजांची शानदार कामगिरी कायम; शुक्रवारी पटकावली दोन सुवर्ण पदके

नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांनी आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (आयएसएसएफ) विश्वचषक स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखताना शुक्रवारी आणखी दोन सुवर्ण पदके पटकावली. पण, ऑलिम्पिकसाठी १६ वे कोटा स्थान मिळविण्याची प्रतीक्षा मात्र कायम आहे. भारत १२ सुवर्ण, ७ रौप्य व ६ कांस्य अशा एकूण २५ पदकांसह तालिकेत अव्वल स्थानी आहे. 

भारताचे अनुभवी नेमबाज संजीव राजपूत व तेजस्विनी सावंत यांनी आयएसएसएफ विश्वचषकमध्ये शुक्रवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. त्यांनी युक्रेनच्या सेरही कुलीश आणि अ‍ॅना इलिना यांना ३१-२९ असे नमविले. संजीव-तेजस्विनी यांनी भारताला अकरावे सुवर्ण पदक पटकावून दिले. ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर व सुनिधी चौहाण यांनी कांस्य पदकाचा मान मिळवला. त्यांनी अमेरिकेच्या तिथोमी शेरी आणि वर्जिनिया थ्रेशर यांचा ३१-१५ असा एकतर्फी पराभव केला.

त्यानंतर स्वप्निल कुसाले, चैन सिंग व नीरज कुमार या भारतीय त्रिकूटाने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पुरुष संघाच्या फायनलमध्ये अमेरिकेचा ४७-२५ ने पराभव करीत सुवर्णपदक पटकावले. विजयवीर संधू याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना रौप्यपदक पटकावले. एस्टोनियाच्या पीटर ओलेस्कोने सुवर्ण जिंकले.

Web Title: Indian shooters continue to excel; Two gold medals won on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.