आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:29 IST2025-09-05T13:28:18+5:302025-09-05T13:29:53+5:30
भारतीय संघ आता शनिवारी चीनविरुद्ध भिडेल.

आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा
राजगिर (बिहार) : यजमान भारताने गुरुवारी आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर फेरीतील आपल्या दुसऱ्या सामन्यात मलेशियाचे तगडे आव्हान ४-१ असे परतवले. दुसन्याच मिनिटाला गोल स्वीकारून पिछाडीवर पडल्यानंतर भारतीयांनी कमालीची मुसंडी मारत मलेशियाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. भारतीय संघ आता शनिवारी चीनविरुद्ध भिडेल.
मलेशियाने आक्रमक सुरुवात करताना सामन्याच्या दुसन्याच मिनिटाला गोल करत १-० अशी आघाडी घेतली. शफिक हसन याने हा शानदार गोल करत भारतावर दडपण आणले. यानंतर पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघ दडपणात खेळला.
मलेशियाने या संधीचा फायदा घेत आपल्या खेळाला चांगला वेग दिला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीयांनी ३ गोल करत सामन्याचे चित्रच पालटले. यावेळी भारतीयांच्या आक्रमक आणि वेगवान खेळापुढे मलेशियाचे खेळाडू हतबल झाले. मनप्रीत सिंगने १६ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केल्यानंतर १८ व्या मिनिटाला सुखजीत सिंगने शानदार मैदानी गोल करत भारताला २-१ असे आघाडीवर नेले. यानंतर शिलानंद लाक्राने २४ व्या मिनिटाला गोल केला आणि विवेक प्रसादने ३८ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला ४-१ अशी भक्कम आघाडी मिळवून देत संघाचा विजयही स्पष्ट केला. या विजयासह सुपर फोर फेरीत भारतीय संघाने ४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून मलेशिया आणि चीन प्रत्येकी ३ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसन्य स्थानी आहेत. कोरिया एका गुणासह चौथ्या स्थानी आहे.
चीनचा कोरियाला धक्का
चीनने गुरुवारी सुपर फोर गटातील लढतीत अनपेक्षित निकाल नोंदवताना गतविजेत्या कोरियाला ३-० असा धक्का दिला. बुधवारी याच कोरिया संघाविरुद्ध भारताला २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. बेन्हाई चेन याने दोन, तर जीशेंग गाओ याने एक गोल केला. कोरियाने या लढतीत १२ पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण त्यांना एकही संधी साधता आली नाही. त्याचवेळी, चीनने सहापैकी २ पेनल्टी कॉर्नरवर गोल करत बाजी मारली.