भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 20:12 IST2025-10-19T19:55:43+5:302025-10-19T20:12:10+5:30
Tanvi Sharma India, BWF World Junior Championships: तन्वीने सामना हरला तरीही मोठा विक्रम आपल्या नावावर केला

भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
BWF World Junior Championships: भारताची १६ वर्षीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्माने जागतिक ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी केली आणि १७ वर्षांनंतर भारतासाठी पदक जिंकले. अंतिम फेरीत तिचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले, पण या स्पर्धेत तिने इतिहास रचला. तन्वीने या चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले. तन्वी ही अंतिम फेरीत पोहोचणारी भारताची तिसरी खेळाडू ठरली. याआधी केवळ सायना नेहवाल आणि अपर्णा पोपट यांनी दोघीच अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या आणि पदके जिंकली होती.
Tanvi Sharma 🇮🇳 ends 17 years of WS medal wait for India.#NextGen#badminton#WJC2025pic.twitter.com/Qzm9aWgVug
— BAI Media (@BAI_Media) October 19, 2025
भारताला १७ वर्षांनी मिळालं पदक
जागतिक ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत तन्वी शर्मा पराभूत झाली. जेतेपदाच्या लढतीत दुसऱ्या मानांकित थायलंडच्या अन्यपत फिचितप्रिचासकने तन्वी शर्माचा १५-७, १५-१२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तन्वीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. १७ वर्षांनंतर जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. यापूर्वी सायना नेहवाल (२००८ मध्ये सुवर्ण आणि २००६ मध्ये रौप्य) आणि अपर्णा पोपट (१९९६ मध्ये रौप्य) या दोघींनी या स्पर्धेत भारतासाठी पदके जिंकली होती.
अंतिम सामन्यात तन्वीचा पराभव
अंतिम सामन्यात सुरूवातीला दोन्ही खेळाडू २-२ आणि नंतर ४-४ असा स्कोअरकार्डवर होता. त्यानंतर थाई खेळाडूने शानदार खेळ दाखवला आणि १०-५ अशी आघाडी घेतली. थाई खेळाडूने तन्वी शर्माच्या बॅकहँड शॉटवर पॉईंट घेत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये, तन्वीने अचूक रिटर्नसह सुरुवात करत ६-१ अशी आघाडी घेतली होती. पण तरीही काही चुकांमुळे थाई खेळाडूने हळूहळू आघाडी घेतली. पुढे खेळ वाढत गेला आणि थाई खेळाडू ९-१३ने आघाडीवर आली. अखेर तन्वीचे प्रयत्न तोकडे पडले. अखेर शक्तिशाली स्मॅश मारून थायलंडच्या अन्यपत फिचितप्रिचासकने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.