भारत - बांगलादेश कसोटी अनिर्णित
By Admin | Updated: June 14, 2015 16:24 IST2015-06-14T16:23:39+5:302015-06-14T16:24:21+5:30
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी पावसामुळे अनिर्णित अवस्थेत संपली आहे.

भारत - बांगलादेश कसोटी अनिर्णित
ऑनलाइन लोकमत
फातुल्ला, दि. १४ - भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी पावसामुळे अनिर्णित अवस्थेत संपली असून हा सामना अनिर्णित राहिल्यानेे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर घसरला आहे. आर. अश्विनने या सामन्यात पाच विकेट घेतल्या असून दोन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करणा-या हरभजन सिंगने तीन विकेट घेतल्या बांगलादेशच्या फलंदाजांना दणका दिला.
फातुल्ला येथे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील एका सामन्या कसोटी मालिका सुरु होती. सामन्याच्या पहिल्या दिवसापासून पावसानेच बॅटिंग केल्याने सामन्याचा निम्म्याहून अधिक वेळ पावसामुळे वाया गेला. शिखर धवनच्या १७३ व मुरली विजयच्या १५० धावांच्या खेळीने भारताने पहिल्या डावात ४६२ धावांचा डोंगर उभा केला. हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांची अश्विन - हरभजनच्या फिरकीने भंबेरी उडवली. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातही पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. दुस-या सत्रात पाऊस थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला. यानंतर फिरकी गोलंदाजांना बांगलादेशला २५६ धावांवर रोखले. भारताने बांगलादेशला फॉलो अॉन दिल्याने बांगलादेशचे फलंदाज पुन्हा फलंदाजीला आले. दुस-या डावात बांगलादेशने बिन बाद २३ धावा केल्या. मात्र अंधूक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला.