आसाम - भारताला जागतिक अजिंक्यपद ( 20 वर्षांखालील ) स्पर्धेत ट्रॅक प्रकारात ऐतिहासिक सुवर्ण जिंकून देणा-या हिमा दासचा आसाम राज्य सरकारकडून आगळा सन्मान करण्यात आला. आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी बुधवारी हिमाच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सुवर्णकन्येला राज्याची 'स्पोर्ट्स अॅम्बेसेडर' करण्यात येणार असल्याची घोषणा केली. सुवर्णकन्येच्या या सन्मानाने तिचे पालक भावूक झाले. आसामच्या हिमाने 51.46 सेकंदाची वेळ नोंदवून 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक नावावर केले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आणि त्याशिवाय ट्रॅक प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्ण ठरले. शेतक-याच्या मुलीने घेतलेल्या या फिनिक्स भरारीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडा व अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी कौतुक केले. राज्यात परतल्यानंतर आसाम सरकारतर्फे हिमाचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले. त्याशिवाय तिला 50 लाख रूपये देण्यात येणार आहेत. सोनोवाल यांनी हिमाचे वडील रंजीत आणि आई जोनाली यांचाही सत्कार केला.
हिमाचा आगळा सन्मान, भारताच्या सुवर्णकन्येला 'स्पोर्ट्स अॅम्बेसेडर'चा मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 13:56 IST