gold medal opportunity lost due to distraction of attention, said wrestler rahul aware | लक्ष विचलित झाल्याने हुकली सुवर्णपदकाची संधी - राहुल आवारे

लक्ष विचलित झाल्याने हुकली सुवर्णपदकाची संधी - राहुल आवारे

जयंत कुलकर्णी,औरंगाबाद : आशियाई स्पर्धा आपल्याच देशात असल्याने सुवर्णपदक जिंकण्याची सर्वांनाच आस होती आणि सुवर्णपदक जिंकण्याचा मला आत्मविश्वासही होता; परंतु उपांत्य फेरीदरम्यान प्रेक्षक गॅलरीतून आवाज आला. त्यामुळे वेळ संपत आला की काय व आपण पराभूत होतोय अशी शंका मनात आली. त्यामुळे एकच सेकंद नजर स्कोअर बोर्डवर टाकली. पण याचवेळी लक्ष विचलित झाल्याचा फायदा प्रतिस्पर्ध्याने घेऊन माझ्यावर हल्ला केला. या एका चुकीमुळे सुवर्णपदकााची संधी हुकली,’ अशी खंत आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा महाराष्ट्राचा स्टार मल्ल राहुल आवारे याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
राहुल सोमवारी म्हणाला, ‘एकाग्रता भंग होऊन चूक होण्याची घटना आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत कधी घडली नाही. प्रेक्षकगृहातून आलेल्या आवाजाच्या वेळी लढत बरोबरीत होती आणि ही लढत जिंकण्याची मोठी संधी मला होती.’ आधीच्या लढतीविषयी राहुल म्हणाला, ‘सुरुवातीला पाकिस्तानविरुद्धच्या मल्लाविरुद्ध लढत होती. ही लढत आपल्याच देशात होत असल्याने जिंकण्याचा मानसिक दबाव होता; परंतु ही लढत मी सहज जिंकली.’
राहुलचा वजन गट याच वर्षी होणाºया टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेसाठी नाही. तथापि, जागतिक स्पर्धेत कांस्य आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाºया राहुलने अपेक्षा सोडली नाही. ‘खाशाबा जाधव यांच्यानंतर आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न आहे. आॅलिम्पिकसाठी मी आशा सोडली नाही. आॅलिम्पिकच्या पात्रतेची प्रतीक्षा आहे. या वेळेस संधी हुकली तरी पुढील ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे माझे लक्ष्य असेल.’

‘आशियाई स्पर्धेच्या सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. उपविभागीय पोलीस अधिकाºयाच्या सरावामध्ये दोन महिने गेले आणि त्यानंतर दहाच दिवसांत चाचणी जिंकली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जास्त सराव लागतो,’ असेही राहुल म्हणतो. भारतात कोणाचे आव्हान असेल असे विचारल्यानंतर तो म्हणाला, ‘आपल्याला भविष्यात रविकुमारचे आव्हान असेल. याआधी मी राष्ट्रकुल चाचणीमध्ये त्याला नमवले आहे. भविष्यातही त्याचे आव्हान यशस्वीपणे परतवण्याचा विश्वास आहे,’ असे राहुल म्हणाला.

मुलगा-वडिलांना शिवछत्रपती पुरस्कार
राहुल आवारे याला २00९-२0१0 या वर्षासाठी शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे, तर त्याचे वडील बाळासाहेब आवारे यांना २0१८-२0१९ या वर्षासाठी मार्गदर्शकाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. याविषयी राहुल म्हणाला, ‘वडिलांना पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झाला. वडिलांनी पहिलवान म्हणून आधी कुस्त्यांचा आखाडा गाजवला, आता त्यांचा मुलगा म्हणून मी गाजवीत आहे. वडिलांनी ग्रामीण भागात राहून स्वत:च्या हिमतीवर तालीम उभारले. लाल मातीची त्यांनी नि:स्वार्थपणे सेवा केली. त्यांनी माझ्या कुस्तीचा श्रीगणेशा बालपणीच केला. ते कडक शिस्तीचे भोक्ते आहेत. लहानपणी व्यायाम केला नाही किंवा खुराक घेतला नाही, तर ते मारायचे.   कुस्तीच हे जीवन समजणाºया वडिलांनी सुरुवातीला पत्र्यांचे शेड टाकू न तालीम बांधली. सुरुवातीला ३0 पहिलवान सराव करायचे. २0१६ मध्ये जवळपास २५ लाख रुपये खर्च करून तालीम बांधली. त्यांनी घडवलेले २0 ते २२ मल्ल विविध ठिकाणी नोकरीला आहेत. कोणाकडूनही एकही पैसा न घेता त्यांनी एक तंदुरुस्त पिढी घडवली.’’

Web Title: gold medal opportunity lost due to distraction of attention, said wrestler rahul aware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.