French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:53 IST2025-06-07T12:52:07+5:302025-06-07T12:53:25+5:30
Jannik Sinner Beat Novak Djokovic: फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत यानिक सिनरने नोवाक जोकोविचचा दारूण पराभव केला.

French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत यानिक सिनरने नोवाक जोकोविचचा दारूण पराभव केला. उपांत्य फेरीत जोकोविच पूर्णपणे लयीत नसल्याचे दिसून आले. या पराभवासह नोवाच जोकोविचचे फ्रेंच ओपन २०२५ चे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. यानिक सिनर आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या कार्लोस अल्काराझ यांच्यात या स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाईल.
सेमीफायनल सामन्यात नोवाक जोकोविचने पहिला सेट ६-४ ने गमावला. त्यानंतर त्याने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अपयशी ठरला. त्याने दुसरा सेट ७-५ ने गमावला. तिसऱ्या सेटमध्ये सामना टायब्रेकरमध्ये गेला. मात्र, येथेही त्याला काही खास कामगिरी करता आली नाही आणि त्याला ७-६ ने पराभव पत्कारावा लागला.
नोवाक जोकोविच हा पुरुष एकेरीत सर्वाधिक २४ ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू आहे. पण फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत तो सिनेरला आव्हान देऊ शकला नाही. सामना गमावल्यानंतर जोकोविच निराश झाला. कदाचित फ्रेंच ओपनमधील हा त्याचा शेवटचा सामना असू शकतो, असे त्याने म्हटले.
"अंतिम सामना दोन सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होईल"
सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर जोकोविचने आपली प्रतिक्रिया दिली. "फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात दोन सर्वोत्तम खेळाडू एकमेकांशी भिडतील. मी सिनरला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा देतो. ही एक अद्भुत स्पर्धा असणार असेल", असे तो म्हणाला.