सेहवागने टाळला धोनीचा नामोल्लेख

By Admin | Updated: December 3, 2015 18:07 IST2015-12-03T16:01:59+5:302015-12-03T18:07:30+5:30

वीरेंद्र सेहवागने फिरोजशहा कोटला मैदानातील सत्काराच्यावेळी सर्वात यशस्वी कर्णधार धोनीचा नामोल्लेख टाळल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Dhoni's name was avoided by Sehwag | सेहवागने टाळला धोनीचा नामोल्लेख

सेहवागने टाळला धोनीचा नामोल्लेख

ऑनलाईन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३ - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेल्या वीरेंद्र सेहवागने फिरोजशहा कोटला मैदानातील सत्काराच्यावेळी सर्वात यशस्वी कर्णधार धोनीचा नामोल्लेख टाळल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.  गुरुवारी दिल्लीच्या फिरोझशहा कोटला स्टेडियमवर भारत-दक्षिण आफ्रिकेमधील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी बीसीसीआयच्यावतीने सेहवागचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळयात बोलताना सेहवागने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मार्गदर्शन केल्याबद्दल माजी कर्णधार सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि सचिन तेंडुलकरचे आभार मानले. 

पण त्याने महेंद्रसिंह धोनीच्या नावाचा उल्लेख टाळला. सेहवाग सहावर्ष धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. दोघे एकत्र संघात खेळत असताना त्यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.  निवृत्तीनंतर सेहवागने धोनीच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले होते. पण गुरुवारी सत्कार सोहळयात सेहवागने धोनीचा उल्लेख टाळला. सेहवागला बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. 

 
> सेहवागने धोनीचे नाव का टाळले - 
सेहवाग- धोनी या वादाला २०१२ पासून सुरुवात झाली होती. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सीनियर खेळाडूंच्या फिल्डिंगविषयी धोनीने केलेल्या वक्तव्यावरून हा वाद सुरू झाला होता. रोटेशन पॉलिसीवरून आधीच मोठा वादंग सुरु होता. त्यात सीनियर्सबाबत धोनीने केलेल्या विधानावरून हा वाद आणखीच वाढला.
धोनीने  म्हटलं होतं की, ‘संघाच्या सीनियर्सना एकत्र एकाच सामन्यात खेळवणं शक्य नाही. कारण क्षेत्ररक्षणात ते इतर यंगस्टर्ससारखे चपळ नाहीत. त्यामुळे भारतीय संघाला किमान २० धावांचा फटका बसतो.’
धोनीच्या या विधानावर वीरेंद्र सेहवागनेही तोडीस तोड उत्तर दिलं होतं. सेहवाग त्यावेळी म्हणाला होता, ‘आजच्या सामन्यात मी घेतलेला झेल पाहिला का? गेली १० वर्ष आम्ही याच पद्धतीने क्षेत्ररक्षण करत आहोत.’

Web Title: Dhoni's name was avoided by Sehwag