Paris Olympics 2024 : दीपिकाने उघडले विजयाचे खाते; १९ महिन्यांच्या लेकीला घरी ठेवून ती माऊली लढतेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 19:29 IST2024-07-31T19:26:08+5:302024-07-31T19:29:07+5:30
Paris Olympics 2024 updates : बुधवारी भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.

Paris Olympics 2024 : दीपिकाने उघडले विजयाचे खाते; १९ महिन्यांच्या लेकीला घरी ठेवून ती माऊली लढतेय
deepika kumari archery olympics 2024 : आपल्या १९ महिन्यांच्या लेकीला मायदेशात ठेवून दीपिका कुमारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आहे. पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्ती केली. पण, बुधवारी तिने तिरंदाजीच्या महिला एकेरी स्पर्धेत नेदरलँड्सच्या क्विंटी रॉफेनचा ६-२ असा पराभव केला. दीपिका आता प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली आहे. आता उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी तिची जर्मनीच्या मिशेल क्रॉपेनशी ३ ऑगस्ट रोजी लढत होईल. काही दिवसांपूर्वी भारतीय महिला तिरंदाज संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला होता, त्यात दीपिकाच्या खराब कामगिरीवर जोरदार टीका झाली होती. (deepika kumari archery)
आपल्या १९ महिन्यांच्या लेकीला भारतात ठेवून पॅरिसला गेलेली दीपिका चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आहे. दीपिका २०२२ मध्ये एका मुलीची आई झाली. ती अद्याप ऑलिम्पिकमधील तिच्या पहिल्या पदकाच्या शोधात आहे. मुलीपासून इतके दिवस लांब राहणे यामागे किती दु:ख लपले आहे हे शब्दांत मांडू शकत नाही. मी मागील अनेक वर्षांपासून ज्या पदकासाठी मेहनत करत आहे त्यासाठी हा त्याग आहे. मला मुलीची खूप आठवण येते, पण त्याला पर्यायही नाही, असे दीपिका सांगते.
भारतीय शिलेदारांची बुधवारची कामगिरी
पीव्ही सिंधूचा सलग दुसरा विजय
लक्ष्य सेनचा 'करा किंवा मरा'च्या सामन्यात विजय
वाढदिवशी श्रीजा अकुलाने देशवासियांना दिली विजयाची भेट
महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेचा अंतिम फेरीत प्रवेश
लवलीना बोरगोहेनचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश
दीपिका कुमारीचा विजय
बुधवारचा दिवस भारतासाठी खूप खास राहिला. पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, श्रीजा अकुला, स्वप्नील कुसाळे आणि लवलीना बोरगोहेन यांनी देखील विजय संपादन केला. महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या स्वप्नीलने अंतिम फेरी गाठली आहे. तो ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. कोल्हापुरचा सुपुत्र असलेल्या स्वप्नीलने ५९० गुणांसह सातवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. भारताची आणखी एक शिलेदार ऐश्वर्य प्रताप सिंग ११व्या क्रमांकावर राहिला अन् तो अंतिम फेरीला मुकला. खरे तर अव्वल आठ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. ऐश्वर्य प्रतापला पहिल्या आठमध्ये स्थान मिळवता न आल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे कोल्हापुरचा पठ्ठ्या भारताला पदक मिळवून देणार का हे पाहण्याजोगे असेल.