CoronaVirus: Worst Fears Come True! | CoronaVirus : सर्वात वाईट भीती खरी ठरली!, ऑलिम्पिक स्थगित होण्यावर विनेशची प्रतिक्रिया

CoronaVirus : सर्वात वाईट भीती खरी ठरली!, ऑलिम्पिक स्थगित होण्यावर विनेशची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : भारताची पदकाची दावेदार कुस्तीपटू विनेश फोगाटने म्हटले आहे की, टोकियो आॅलिम्पिक स्थगित होणे माझ्यासाठी सर्वात वाईट स्वप्न होते आणि भविष्यातील प्रदीर्घ प्रतीक्षा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणखी कडवी असेल. विनेशचे हे मत असले तरी माजी सुवर्ण विजेता अभिनव बिंद्रा, बॉक्सर विकास कृष्णन, नीरज चोप्रा या खेळाडूंनी या स्थगितीचे स्वागत केले आहे. हा निर्णय योग्य वेळी घेण्यात आल्याचे बिंद्रा याने म्हटले आहे.
कोविड-१९ महामारीमुळे टोकियो आॅलिम्पिक २०२० ला पुढील वर्षापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. हे वृत्त कळल्यानंतही विनेश निराश झाली.
विनेशने टिष्ट्वट केले, ‘कुठल्याही खेळाडूसाठी हे वाईट स्वप्नाप्रमाणे असते आणि शेवटी ते खरे ठरले. आॅलिम्पिकमध्ये खेळणे एका खेळाडूसाठी सर्वांत कठीण आव्हान असते, पण या पातळीवर संधीची प्रतीक्षा करणे त्यापेक्षा खडतर आहे.’
विनेश पुढे म्हणाली, ‘आता काय म्हणायचे आहे, हे मला नाही माहिती, पण मी भावनाविवश झाली आहे.’
रिओ आॅलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे लवकरच आव्हान संपुष्टात आलेल्या विनेशकडून भारताला पदकाची आशा आहे. तिने गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावत टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.
विनेश म्हणाली, ‘जगापुढे हा कठीण समय आहे. मीसुद्धा निराश आहे, पण आपल्याला या निराशेतही आशेचा किरण शोधावा लागणार आहे.’
स्थगितीचा निर्णय योग्यवेळी - अभिनव बिंद्रा
टोकियो आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्याचा निर्णय आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीने योग्यवेळी आणि ताबडतोब घेतला, असे मत आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केले आहे. आॅलिम्पिकबाबत विचार करण्यास आयओसी वेळ लावत असल्याचा आरोप करीत अनेक दिग्गज खेळाडू आणि त्यांच्या राष्टÑीय महासंघांनी आयओसीवर टीका केली होती.
आयोजन समिती आणि आयओसीने मंगळवारी कोरोना व्हायरसच्या प्रकोपाची भीषणता लक्षात घेत आयोजन वर्षभर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाआधी ब्रिटन आणि कनडा येथील आॅलिम्पिक महासंघांनी आयओसीविरुद्ध नाराजीचा सूर आळवला होता. बिंद्राने मात्र हा योग्यवेळी घेतला ताबडतोब निर्णय असल्याचे सांगून आयओसीचे कौतुक केले. अभिनव म्हणाला, ‘निर्णय त्वरित घेतला हे पाहून बरे वाटले. आॅलिम्पिक होणार की नाही याबाबत अनिश्चितता वाढत चालली होती. माझ्या मते, हा कठीण निर्णय योग्यवेळी घेण्यात आला आहे. यामुळे खेळाडू आता आणखी जोमाने तयारी करू शकतील. हा काळ आरोग्याची काळजी घेण्याचा असल्याने आपल्या जवळपास वास्तव्यास असलेल्या लोकांच्या आरोग्याची काळजीदेखील खेळाडूंना घेता येईल.’ बिंद्रा स्वत: आयओसी अ‍ॅथलिट आयोगाचा सदस्य आहे. जगातील अनेक खेळाडूंनी आॅलिम्पिक स्थगित करण्याची मागणी होती. या मागणीनुसारच आयओसीने खेळ लांबणीवर टाकले आहेत.’ बीजिंग आॅलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफलचा सुवर्ण विजेता असलेला अभिनव पुढे म्हणाला, ‘आम्ही सातत्याने खेळाडूंच्या संपर्कात होतो. खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य असल्याचा जो संदेश पुढे आला, तो वाखाणण्यासारखा आहे. ही अनपेक्षित स्थिती आहे. सर्व खेळाडू आणि खेळाशी संबंधित लोकांचे आरोग्य सर्वतोपरी असल्याचा आयओसीचा सिद्धांत आहे. व्हायरसवर नियंत्रण आणि विजय मिळविण्यासाठी होत असलेल्या कामांचे आम्ही कौतुक करीत असून निर्णय योग्य आणि समयसूचकेतचा आहे.’ (वृत्तसंस्था)

Web Title:  CoronaVirus: Worst Fears Come True!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.