Commonwealth Games 2018: भारतीय महिलांनी गाजवले वर्चस्व, पूनम यादव, मनू भाकर व महिला टेटे संघाला सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:40 AM2018-04-09T01:40:13+5:302018-04-09T01:40:13+5:30

भारोत्तोलनापासून बॉक्सिंगपर्यंत व टेबलटेनिस ते हॉकी या सर्व खेळात भारतीय महिला खेळाडूंनी २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत चौथ्या दिवशी शानदार कामगिरी केली.

Commonwealth Games 2018: Indian women's domination, Poonam Yadav, Manu Bhakra and women's team's gold medal | Commonwealth Games 2018: भारतीय महिलांनी गाजवले वर्चस्व, पूनम यादव, मनू भाकर व महिला टेटे संघाला सुवर्णपदक

Commonwealth Games 2018: भारतीय महिलांनी गाजवले वर्चस्व, पूनम यादव, मनू भाकर व महिला टेटे संघाला सुवर्णपदक

Next

गोल्ड कोस्ट : भारोत्तोलनापासून बॉक्सिंगपर्यंत व टेबलटेनिस ते हॉकी या सर्व खेळात भारतीय महिला खेळाडूंनी २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत चौथ्या दिवशी शानदार कामगिरी केली. त्यात १६ वर्षीय मनू भाकरने विक्रमी कामगिरी करीत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक पटकावले तर टेबल टेनिस संघाने गत चॅम्पियन सिंगापूरचा पराभव करीत प्रथमच या स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळवला.
भारोत्तोलनामध्ये सुवर्णमय कामगिरी कायम राखताना आज पूनम यादवने ६९ किलो वजन गटात देशाला या क्रीडा प्रकारात पाचवे सुवर्णपदक पटकावून दिले.
बॉक्सिंगमध्ये ३५ वर्षीय एम. सी. मेरीकोमने पदक निश्चित केले. कदाचित तिची ही पहिली आणि अखेरची राष्ट्रकुल स्पर्धा ठरू शकते. भारत पदक तालिकेत ७ सुवर्ण, २ रौप्य व ३ कांस्यपदकांसह चौथ्या स्थानी आहे.
इंग्लंडला पराभवाचा धक्का
भारतीय महिला हॉकी संघाने पिछाडीवरुन अफलातून खेळ करत आॅलिम्पिक विजेत्या इंग्लंडला २-१ असे पराभूत करून खळबळ उडवली. यासह भारतीय महिला गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असल्याने त्यांच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा पल्लवीत झाल्या. ३५व्या मिनिटाला इंग्लंडची कर्णधार अलेक्झांड्रा डेनसनने गोल करून संघाला आघाडीवर नेले. नंतर भारतीयांनी उत्कृष्ट पासिंगचा खेळ केला. ४२व्या मिनिटाला भारतीय संघाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा पूर्ण फायदा घेत गुरजितने कोणतीही चूक न करता चेंडू गोलमध्ये टाकत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर सहा मिनिटांनी नवनीतने फिल्ड गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी भारतीयांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. (वृत्तसंस्था)
>अ‍ॅथलेटिक्समध्ये भारतीयांची चमक
ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात भारताच्या मोहम्मद अनास याहियाने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४५.९६ सेकंदाची वेळ नोंदवून उपांत्यफेरीतील आपली जागा निश्चित केली. दुसरीकडे तेजिंदर सिंहने गोळाफेक प्रकारात आपल्या अंतिम संधीमध्ये १९-१० मीटर गोळा फेकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
>टेबल टेनिसमध्ये सुवर्ण कामगिरी...
सायंकाळच्या सत्रात मोनिका बत्राने एकेरीच्या लढतीत शानदार विजय मिळवत भारताला महिला टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून दिले. भारताने अंतिम फेरीत चारवेळा सुवर्णपदकाचा मान मिळवणाºया सिंगापूरचा ३-१ ने पराभव करीत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले.
>मेरीचे पदक पक्के
पाच वेळची विश्वविजेती भारताच्या एमसी मेरीकोमने ४८ किलो वजन गटात उपांत्यफेरी प्रवेश करून आपले पदक पक्के केले. दुसरीकडे विकास कृष्णनने ७५ किलो वजन गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती ३५ वर्षीय मेरीकोमने स्कॉटलंडच्या मेगन गोर्डोनचा ५-० गुणांनी पराभव केला. पुरुषांच्या गटात विकास कृष्णनने आॅस्ट्रेलियाच्या कॅम्पबेल समरविला पंचांच्या निर्णयानुसार ५-०
गुणांनी नमविले.
>भारतीय मिश्र संघाने सिंगापूरचा घेतला बदला
ग्लास्गो राष्टÑकुल स्पर्धेत प्ले आॅफमध्ये सिंगापूरकडून मिळालेल्या पराभवाचा वचपा रविवारी भारतीय संघाने काढला. सायना नेहवालच्या अफलातून खेळाच्या जोरावर भारतीय मिश्र संघाने बॅडमिंटनमध्ये सिंगापूर संघाचा ३-१ गेमने पराभव करून अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. सायनाने सिंगापूरच्या जिया मिन यिओला सरळ दोन गेममध्ये २१-८, २१-१५ गुणांनी नमविले. तत्पूर्वी, मिश्र दुहेरीत सात्विक रांकीरेड्डी व अश्विनी पोनप्पाने योंग केरी टैरी व जिया यिग क्रिस्टल वोंगचा २२-२०, २१-१८ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत मात्र भारतीय जोडी सात्विक व चिराग शेट्टी यांचा टैरी ही व डैनी बावाकडून १७-२१, २१-१९, २१-१२ गुणांनी पराभव झाला. किदाम्बी श्रीकांतने यू लाला २१-१७, २१-१४ असे पराभूत केले.
>भारोत्तोलनमध्ये पूनमने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना
२२२ किलो वजन पेलले आणि २०१४ मध्ये पटकावलेल्या कांस्यपदकाचा रंग बदलताना सुवर्णपदक पटकावले. विकास ठाकूरने पुरुषांच्या ९४ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावले. विकासने ३५१ किलो (१५९ किलो व १९२ किलो) वजन पेलले. पापुआ न्यू गिनीच्या स्टीव्हन कारीने क्लीन अँड जकॅमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचा विक्रम नोंदवताना सुवर्णपदक पटकावले. भारताने भारोत्तोलनमध्ये एकूण पाच सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे.
>पुरुष हॉकीमध्ये अनुभवी एस.व्ही. सुनीलने ५९ व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलच्या जोरावर भारताने ‘ब’ गटातील लढतीत वेल्सचे कडवे आव्हान परतवून लावताना ४-३ ने विजय मिळवला. रुपिंदर पाल सिंगची ड्रेगफ्लिक वेल्सच्या गोलकिपरने थोपवली होती, पण सुनीलने रिबाऊंडवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीच्या तुलनेत या सामन्यात भारताच्या बचाव फळीने अखेरच्या क्षणी संयम कामय राखत भारताला पूर्ण तीन गुण मिळवून दिले. भारतातर्फे अन्य गोल दिलप्रीत सिंग (१६ वा मिनिट), मनदीप सिंग (२८ वा मिनिट) आणि हरमनप्रीत सिंग (५७ वा मिनिट) यांनी केले. वेल्सतर्फे गॅरेथ फरलोंग (१७ , ४५ व ५८ वा मिनिट) याने गोलची हॅट््ट्रिक नोंदवताना संघाला पिछाडीवर पडल्यानंतर तीनदा बरोबरी साधून दिली. संघाला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले त्यापैकी तीनवर गॅरेथने गोल नोंदवले.
महिला हॉकी संघाने आपल्या गटातील तिसºया लढतीत शानदार खेळ करताना आॅलिम्पिक चॅम्पियन इंग्लंडचा २-१ ने पराभव केला. या विजयामुळे भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले आहे.
मनूने १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत २४०.९ चा स्कोअर करीत राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रम नोंदवताना सुवर्णपदक पटकावले तर हीना सिद्धूने शानदार पुनरागमन करताना रौप्यपदकावर नाव कोरले. दुसºया स्थानावर राहिलेल्या हीनाचा स्कोअर २३४ होता. मनू हीनाच्या तुलनेत ६.९ गुणांनी आघाडीवर राहील.मनूप्रमाणेच आपल्या पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होत असलेल्या रवी कुमारने (२२४.१) शुटआॅफनंतर पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.

Web Title: Commonwealth Games 2018: Indian women's domination, Poonam Yadav, Manu Bhakra and women's team's gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.