कराटेमध्ये शहराला पहिल्यांदाच मिळाली ३८ पदके, कराटेपटूंची चमकदार कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 17:44 IST2017-11-16T17:43:59+5:302017-11-16T17:44:42+5:30
भार्इंदर - राज्यातील ४० स्पर्धकांपैकी मीरा-भार्इंदरमधील २८ कराटेपटूंनी केरळ येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत विविध प्रकारांत एकूण ३८ पदकांची लयलूट केली.

कराटेमध्ये शहराला पहिल्यांदाच मिळाली ३८ पदके, कराटेपटूंची चमकदार कामगिरी
राजू काळे
भार्इंदर - राज्यातील ४० स्पर्धकांपैकी मीरा-भार्इंदरमधील २८ कराटेपटूंनी केरळ येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत विविध प्रकारांत एकूण ३८ पदकांची लयलूट केली. शहरातील क्रीडापटूंना राज्याबाहेरील एकाच स्पर्धेत मोठ्या प्रमाणात पदके मिळण्याची ही पहिलीच घटना असल्याने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ओकीनावा शोरीन ह्यू उदेन्ती कोबुत्सु असोसिएशन आॅफ इंडिया (केएआई) या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत आयोजित राष्ट्रीय मास्टर्स कप २०१७ ही कराटे स्पर्धा केरळ राज्याच्या वायनाड जिल्ह्यातील सुल्तान बहेरी येथे ११ व १२ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक, बंगळुरू, तामिळनाडू, म्हैसूर, तेलंगणा, केरळ या राज्यांतून सुमारे दीड हजार कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. तर महाराष्ट्रातून ४० कराटेपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी शहरातील २८ कराटेपटूंनी प्रशिक्षक विजय शिगवण, सहाय्यक प्रशिक्षक विनायक रेडकर, अभय मिश्रा, पथकाचे व्यवस्थापक श्रीकांत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कामगिरी केली.
कराटेच्या विविध प्रकारांत सैफ नागुठणेने सुवर्ण, अश्विनी जोशीने सुवर्ण, मनवीत शेट्टीने सुवर्ण, अग्रजा तिवारी व संयमी ठाकूरने अनुक्रमे सुवर्ण, रजत व कांस्य पदक, आभा भागुडिया, मनू नायर, सूरज नाडर व जान्हवी सोनावणेने अनुक्रमे सुवर्ण व कांस्य, परीक्षित गगलानी, निशांत घोष, सुदिक्षा विश्वनाथ, विघ्नेश शुक्ला, आस्था दंगने प्रत्येकी रजत, जय सुवागिया, श्रेया दासने अनुक्रमे रजत व कांस्य, रितेश शेवाळे, हर्ष शेट्टी, सोहम नंदी, कृष्णा नाग, सिद्धेश सात्विडकर, श्रेयस सरपाटील, सनी खेडेकर, आयुष सोरे, आदित्य खोलेकरने प्रत्येकी कांस्य तर जयराज मिश्राने एकूण दोन कांस्य पदकांची लयलूट केली.
शहरातील कराटेपटूंनी एकाच स्पर्धेतील विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणात मिळविलेल्या पदकांची ही पहिलीच घटना ठरली आहे. या स्पर्धेत सुवर्ण पदके मिळविणा-या ९ कराटेपटूंची आॅगस्ट २०१८ मध्ये जपानच्या ओकीनावा येथे पार पडणा-या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आल्याचे प्रशिक्षक विजय शिगवण यांनी सांगितले.
यशस्वी स्पर्धकांच्या पथकाचे १५ नोव्हेंबरला भार्इंदरच्या नवघर गावात मध्यरात्री १.३० वाजता आगमन झाले. त्यावेळी सेनेच्या स्थानिक नगरसेविका तारा घरत यांनी आवर्जून यशस्वी स्पर्धकांचे कौतुक करून त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सर्व यशस्वी स्पर्धकांचा गौरव येत्या पालिका महासभेत करण्यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.