मच्छीमाराच्या मुलाने साधला ‘मिशन ऑलिम्पिक’ कुस्तीत सुवर्णडाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 17:42 IST2026-01-24T17:39:57+5:302026-01-24T17:42:27+5:30

मलेशियाच्याच पैलवानास चारीमुंड्या चीत करून सुवर्णपदक खेचून आणले

Chaitanya Salunkhe a wrestler from Mayni in Satara district won a gold medal in the Mission Olympic Wrestling Championship held in Thailand | मच्छीमाराच्या मुलाने साधला ‘मिशन ऑलिम्पिक’ कुस्तीत सुवर्णडाव!

मच्छीमाराच्या मुलाने साधला ‘मिशन ऑलिम्पिक’ कुस्तीत सुवर्णडाव!

मायणी : खटाव तालुक्यातील मायणी येथील मच्छीमाराचा मुलगा पैलवान चैतन्य साळुंखे याने ७९ किलो वजनी गटामध्ये थायलंड येथे झालेल्या मिशन ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय फ्री स्टाइल चॅम्पियन कुस्ती स्पर्धेमध्ये डाव साधून सुवर्णपदक प्राप्त केले आहे, तसेच पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी एक आशेचा किरण निर्माण करून देशाचे व गावचे नाव अटकेपार नेले आहे.

मायणीचा सुपुत्र पैलवान चैतन्य मच्छिंद्र साळुंखे याने वयाच्या १५ व्या वर्षापासून कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यास प्रारंभ केला. त्याने यापूर्वी तालुका व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, तर राज्य पातळीवरील कुस्ती स्पर्धेत त्याने रजत पदक प्राप्त केले आहे. देशांतर्गत बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ७९ किलो वजन गटात सुवर्ण व सन २०२४ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ६५ किलो वजन गटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

थायलंड येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत त्याने कझाकिस्तान व उज्बेकिस्तान या देशातील पैलवानांचा पराभव करून अखेरच्या कुस्तीत मलेशियाच्याच पैलवानास चारीमुंड्या चीत करून सुवर्णपदक खेचून आणले.

पैलवान चैतन्यचे शिक्षण मायणी येथील प्राथमिक शाळा व भारत माता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे झाले असून, तो सध्या बारावीमध्ये कला शाखेत शिक्षण घेत आहे. वडील मच्छिंद्र साळुंखे हे मच्छीमारीचा व्यवसाय करून प्रपंच चालवितात. अत्यंत आर्थिक अडचणीची परिस्थिती असतानादेखील त्यांनी यावर मात करून आपल्या मुलाला पैलवान बनवण्यात मोलाचा वाटा उचलला.

शासनाने कुस्तीच्या खेळास चालना व प्रेरणा द्यावी..

राज्य शासनानेही या उत्कृष्ट व कौतुकास्पद कामगिरीचे कौतुक करून त्याचा सत्कार करावा व त्याच्या पुढील शिक्षणाची व कुस्ती कारकिर्दीची जबाबदारी उचलून त्याच्या कुस्तीच्या खेळास चालना व प्रेरणा द्यावी, अशा अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

मिशन ऑलिम्पिकनंतर अजून एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत असेच यश मिळाल्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र होईन. - चैतन्य साळुंखे, पैलवान

Web Title : मछुआरे के बेटे ने 'मिशन ओलंपिक' कुश्ती में जीता स्वर्ण!

Web Summary : मछुआरे के बेटे चैतन्य सालुंखे ने थाईलैंड में 'मिशन ओलंपिक' कुश्ती प्रतियोगिता में स्वर्ण पदक जीता। भारत का प्रतिनिधित्व करते हुए, उन्होंने कजाकिस्तान, उज्बेकिस्तान और मलेशिया के पहलवानों को हराया। यह जीत आगामी ओलंपिक के लिए उनकी संभावनाओं को बढ़ाती है, जिससे उनके गांव को गर्व है।

Web Title : Fisherman's Son Wins Gold in 'Mission Olympic' Wrestling!

Web Summary : Chaitanya Salunkhe, son of a fisherman, secured a gold medal at the 'Mission Olympic' wrestling competition in Thailand. Representing India, he defeated wrestlers from Kazakhstan, Uzbekistan, and Malaysia. This victory boosts his chances for the upcoming Olympics, bringing pride to his village.