क्वाललांपूर : भारताच्या पुरुष व महिला संघांनी आपआपल्या सामन्यात निर्णायक बाजी मारताना जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. द्वितीय श्रेणी गटात सलामीला व्हिएतनाम संघाला सहज नमवल्यानंतर भारताच्या पुरुषांनी दुसऱ्या सामन्यातही तुर्कस्थानला सहज नमवले.अचंता शरथ कमलने पहिल्या लढतीत अपेक्षित विजयासह उब्राहित गुंदुजला ११-५, ११-५, ११-७ असा सहज विजय मिळवला. तर यानंतर सौम्यजित घोषने गेनकाय मेंगेला ११-८, ११-६, ११-७ असे नमवून भारताला २-० असे आघाडीवर नेले. यानंतर झालेल्या तिसऱ्या लढतीत राष्ट्रीय विजेत्या अँथोनी अमलराजने झुंजार खेळ करताना पहिला गेम गमावल्यानंतर अब्दुल्ला यिगेनलरचे आव्हान ३-११, ११-४, ११-६, ११-७ असे परतावले. या विजयासह भारताने सहजपणे विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याच वेळी भारताच्या महिलांना मात्र विजयासाठी पुएर्टो रिकोकडून कडव्या झुंजीस सामोरे जावे लागले. मौमा दासला पहिला गेम जिंकूनदेखील सलामीची लढत गमवावी लागल्याने भारत सुरुवातीलाच पिछाडीवर पडला. एड्रिएना डियाजने अप्रतिम लढवय्या खेळ करताना मौमाचे तगडे आव्हान ५-११, ११-२, ११-७, ११-९ असे परतावले. यानंतर मात्र भारतीय संघाने पुएर्टो रिकोला संधी दिली नाही.शामिनीने यानंतरच्या एकेरी लढतीत मेलाइन डियाजचा १२-१०, ११-९, ७-११, ११-५ असा पराभव करून भारताला बरोबरी साधून दिली. तर स्पर्धेत आपला पहिला सामना खेळत असलेल्या मधुरिकाने डेनियली रियोज विरुद्ध ११-४, ११-९, ११-७ असा दणदणीत विजय मिळवताना भारताला २-१ असे आघाडीवर नेले. यानंतर परतीच्या एकेरी लढतीत अनपेक्षित निकाल नोंदवलेल्या एड्रिएनाचा ११-७, १३-११, ८-११, ११-८ असा पराभव करून शामिनीने भारताच्या विजयावर ३-१ असा शिक्का मारला. (वृत्तसंस्था)
भारताचे दोन्ही संघ तिसऱ्या फेरीत
By admin | Updated: March 1, 2016 03:02 IST