ऑगस्ट महिना सिंधूसाठी आहे लकी; पाहा ही थक्क करणारी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 07:44 PM2019-08-25T19:44:00+5:302019-08-25T19:49:38+5:30

‘ऑगस्ट’चे इंग्रजीमध्ये दोन अर्थ आहेत. एक तरऑगस्ट महिना आणि दुसरा म्हणजे सन्मान-प्रतिष्ठा किंवा अत्युच्च दर्जाची कामगिरी.

August Month Is Lucky For Sindhu; Look at this astonishing performance | ऑगस्ट महिना सिंधूसाठी आहे लकी; पाहा ही थक्क करणारी कामगिरी

ऑगस्ट महिना सिंधूसाठी आहे लकी; पाहा ही थक्क करणारी कामगिरी

Next

-ललित झांबरे

‘ऑगस्ट’चे इंग्रजीमध्ये दोन अर्थ आहेत. एक तरऑगस्ट महिना आणि दुसरा म्हणजे सन्मान-प्रतिष्ठा किंवा अत्युच्च दर्जाची कामगिरी. म्हणून ऑगस्ट कंपनी असा शब्दप्रयोग इंग्रजीत रूढ आहे. बॅडमिंटनमध्ये भारताला पहिले विश्वविजेतेपद जिंकून देणारी पी.व्ही. सिंधू हिचे विश्वविजेतेपदाचेच यश मुळात ‘ऑगस्ट’ असले तरी तिने आपल्या कारकिर्दीत नेहमीच ऑगस्ट महिन्यामध्ये ‘ऑगस्ट’ कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. 

याचा दाखला म्हणजे सिंधूने जिंकलेली प्रमुख आंतरराष्ट्रीय पदकं. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत २०१५ वगळता सिंधूने दरवेळी कोणते न कोणते पदक जिंकले आहे. २०१३ व १४ मध्ये कास्य, २०१७ व १८ मध्ये रौप्य आणि आता २०१९ मध्ये थेट सुवर्णपदक अशी तिची कमाई आहे आणि यातले सर्वात मोठे वैशिट्य म्हणजे प्रत्येक वेळी ही स्पर्धा ऑगस्ट महिन्यातच खेळली गेली आहे.

यादरम्यानच्या काळात रियो ऑलिम्पिकमध्येही तिने रौप्यपदक जिंकले. तो अंतिम सामनासुद्धा १९ ऑगस्ट २०१६ रोजी खेळला गेला होता. एवढंच नाही तर २०१८ च्या आशियाडमध्ये तिने जिंकलेले रौप्यपदकसुद्धा ऑगस्ट महिन्यातलेच (२८ ऑगस्ट २०१८) होते आणि २०१४च्या राष्ट्रकुल सामन्यातील तिचे कांस्यपदकही ऑगस्ट महिन्यातीलच (३ऑगस्ट) होते. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात सिंधू नेहमीच ‘ऑगस्ट’ कामगिरी करते हे सिध्द झाले आहे. 

ऑगस्टमध्ये सिंधू आपला खेळ कसा उंचावते हेसुद्धा बघण्यासारखे आहे. २०१६ मध्ये रियो ऑलिम्पिकआधी तिने सुपरसिरीज स्पर्धेची उपांत्यफेरीसुद्धा गाठलेली नव्हती पण रियो सामन्यांमध्ये तिने थेट अंतिम फेरी गाठली. २०१७ मध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या रौप्यपदकाआधी ती एकच स्पर्धा जिंकू शकलेली होती आणि २०१८ मध्ये तर तिने ऑगस्टआधी एकही विजेतेपद घेतलेले नव्हते. यंदासुद्धा विश्वविजेतेपदाआधी एकही विजेतेपद तिच्या नावावर नव्हते. केवळ इंडोनेशियन ओपनची गाठलेली अंतिम फेरी ही तिची यंदाची याआधीची सर्वोत्तम कामगिरी होती पण ऑगस्ट येताच सिंधूने नेहमीप्रमाणे गिअर बदलले आणि आता थेट विश्वविजेतेपदावरच आपले नाव कोरले आहे.

Web Title: August Month Is Lucky For Sindhu; Look at this astonishing performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.